१) तेलकट डाग, बॅक्टेरिया मुळे होणारा करपा किंवा तेल्या 2007 ते 2012 या काळात तेल्याचे डाळिंब उत्पादकांचे कंबरडे मोडले. सुरुवातीला हे फळांवरील ठिपके आहेत असा सर्वांचा गैरसमज झाला. मात्र आता ते तेलकट डाग किंवा तेल्या म्हणून ओळखले जावू लागलेत, ते त्यांच्या फळांवरील विशिष्ट तेलकट डागांमुळे. याचे कारण झॅन्थोमोनास ऍक्सोनोपोडीस pv पुनिकी हा बॅक्टेरीया आहे, ज्याचा भाउबंद लिंबूवर्गीय फळातील कॅंकरमध्ये दिसून येतो. त्याचा प्रसार झाडावरील जखमा आणि झाडाच्या नैसर्गिक छिद्रामधून होतो.सुरुवातीला पाण्याने भरलेले फोड येऊन 2-3 दिवसात पाणी सुकून गडद लाल व तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात. जुलै-सप्टेंबर व ऑक्टोबर मधील कालावधीत याचा प्रसार वेगाने होतो. नियंत्रणाचे उपाय पुढील प्रमाणे: प्रतिबंध: रोगट गोष्टींचा झाडाशी संबंध येऊ न देणे, बागेत वापरलेली उपकरणे , हत्यारे डेटाॅल किंवा मोरचुदच्या द्रावणाने(50g/L) स्वच्छ करूनच वापरणे, या गोष्टी कटाक्षाने पाळाव्या. ओलसर जमिनीत शेणखत/ कम्पोस्ट मध्ये मिसळून जैविक बुरशीनाशकांचा चांगला उपयोग होतो. 5kg ट्रायकोडर्मा किंवा 2.5 kg ट्रायकोडर्मा+ 2.5kg पॅसिलोमयसिस प्रती हेक्टर वापरावा. रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर उपाय: मातीतील रोगकारक जीवाणूंची संख्या कमी करणे महत्वाचे असते. त्यासाठी सुरुवातीला बुरशिनाशकांची भिजवणी आणि नंतर जैविक बुरशिनाशकांचा वापर फायदेशीर ठरते. जैविक बुरशीनाशके रासायनिक बुरशीनाशकासोबत किंवा त्यानंतर 8 दिवसात वापरु नयेत. स्ट्रेप्टोसाइक्लिन किंवा ब्रोनोपोल (250g/100L पाण्यात) + 2.5 g/L कॅप्टन 50 WP किंवा COC; पहिल्या फवारणीच्या 10-15 दिवसानी फवारावे. स्ट्रेप्टोसाइक्लिन किंवा ब्रोनोपोल किंवा PMBS (पोटॅशियम मेटा बाय सल्फाइट) 40% फॉस्फनिक ऍसिड सॉल्ट्स युक्त बॅक्टेरीया नियंत्रकय नाशक(प्रॉफीलॅलीक्झीन) आलटून पालटून वापरा. सूत्रकृमी आणि इतर प्रादुर्भावांचे नियंत्रण करा आणि पिक रोगमुक्त ठेवल्यानेही या रोगाचे नियंत्रण सुधारते किंवा संक्रमण वाढत नाही. २) पिकातील मर मर रोगात फांद्या सुकून पीक मेल्यासारखे दिसते, त्याची कारणे सेराटोसायटीस फिमब्रियाटा, फ्युसारियम ऑक्सीस्पोरम, रायझोक्टोनिया सोलानी या विविध बुरशिंचा प्रादुर्भाव तसेच सूत्रकृमी अशी बरीच आहेत. सुरुवातीला पाने आणि फांद्या पिवळट, तपकिरी दिसतात आणि नंतर सुकून जातात,कालांतराने पूर्ण झाडही वाळून जाते. हा रोग निचरा न होणा-या आणि भारी जमिनीत होतो. कार्बेनडाझिम (बावीस्टिन/सहारा) 2gm/Ltr किंवा प्रॉपिकॉनाझोल (रडार,टिल्ट) 1.5ml/Ltr पाण्यात मिसळून आळवणी करा. कार्बेन्डॅझीम भिजवणीनंतर एक महिन्याने 1kg/acre ट्रायकोडर्मा + पॅसिलोमायसीस + 40kg शेणखत हे मिश्रण करून खोडाजवळ पसरा. पिक सूत्रकृमी मुक्त ठेवा,सूत्रकृमीमुळे मुळांना बाधा पोहोचते व रोगांना शिरकाव मिळतो . ३) शॉट होल बोरर/ खोडकिडा खोडकिडीच्या नियंत्रणासाठी गेरु (लाल माती) 400gm/Ltr पाण्यात रात्रभर भिजत ठेवावी, दुस-या दिवशी त्यामध्ये लिंडेन 20 ईसी 2.5ml किंवा क्लोरपायरीफॉस 20 ईसी 5 ml आणि कॉपर ऑक्सीक्लोराइड 2.5 gm/Ltr याप्रमाणे मिसळून त्याची स्लरी तयार करावी व ती ब्रशच्या साहाय्याने खोडावर लावावी. त्याचबरोबर लिंडेन 20 ईसी 2.5ml किंवा क्लोरपायरीफॉस 20 ईसी 5 ml आणि कॉपर ऑक्सीक्लोराइड 2.5 gm/5Ltrपाणी याप्रमाणे प्रती झाड मुळांच्याजवळ भिजवणी करावी. क्लोरपायरीफॉस (स्काउट, ट्रायसेल)2ml/Ltr किंवा स्पिनोसॅड (सक्सेस, ट्रेसर) 0.5ml/Ltr पाण्यातून फवारा. PHI 40,28 दिवस अनुक्रमे ४) सूत्रकृमी सूत्रकृमीमुळे केवळ मुळांना बाधा पोहचते असे नाही तर अनेक रोगांचे ते मूळ कारण बनतात. यांच्या प्रतिबंधासाठी झेंडूची आंतरपीक म्हणून लागवड करावी, त्याचबरोबर निंबोळी पेंड (1 टन /हे) मातीमधून द्यावे. टोमॅटो, मिरची व वांगी या सूत्रकृमिला बळी पडणा-या पिकांची आंतरपीक म्हणून लागवड टाळावी. रासायनिक नियंत्रण: 10% दाणेदार फोरेट 10-20gm प्रती झाड किंवा कार्बोफ्यूरान3G @20-40gm प्रती झाड बांगडी पद्धतीने जमिनीत मिसळून द्या आणि मातीने झाकून घ्या. ५) फळे तडकणे खताच्या व पाण्याच्या अयोग्य व्यवस्थापनाने फळ तडकण्याची समस्या उद्भवते, तसेच विविध रोगांमुळे सुद्धा फळे तडकतात. अ) संपूर्ण पीक व्यवस्थापानमध्ये नियमीत खत व पाण्याचे नियोजन करावे,पिकाला कोणत्याही प्रकारे कसलाही ताण पडू देऊ नये. त्यामुळे पिकाची रोग प्रतिकारक शक्ति वाढते व तडकण्याची समस्या कमी होते. आच्छादन पद्धतीचा अवलंब करावा त्यामुळे पीक हवामानातील बदल वा ताणामुळे होणार्या समस्येला तोंड देते . मातीमधील सेंद्रिय घटक ही वाढतात. याशिवाय विंड ब्रेक्स (वारा अडवणा-या झाडांचा पट्टा) असेल तर जोराचा वारा, पाऊस आणि अन्य हवामानाच्या ताणापासून पीक वाचते ब) नेहमी जमिनीतल कोरडेपणा जास्त राहणे , तसेच पाणी साठणे टाळा. जमिनीमध्ये योग्य तो ओलावा राहील याकडे लक्ष द्या, त्याचबरोबर पाण्याचा अनियमीत पुरवठा हे फळ तडकण्याचे सर्वात मुख्य कारण आहे. ठिबकद्वारे पिकाचे व्यवस्थापन केल्यास पीक त्याला चांगला प्रतिसाद देते, कारण त्यामुळे खताचा व पाण्याचा पुरवठा पिकाला नियमीत होतो व फळ तडकणे ही थांबते. क) बोरान आणि कॅल्षियमच्या कतरतेने फळे तडकतात, नियमीत निरीक्षण करून सूक्ष्म अन्नद्रव्यांची १ फवारणी, फुलो-यापूर्वी,फुलो-यात व फळ तयार होताना करावी, त्यामुळे फळ तडकण्याची समस्या कमी होते व किड रोगांपासूनही नियंत्रण होते. किंवा प्रत्येकी 2 g m MgSo4, FeSo4, MnSo4 आणि 1 gm सोल्यूबोर प्रति ली. पाण्यात मिसळून 3 वेळा फवारावे: फुलो-यापूर्वी, फुलो-याच्या वेळी आणि फळे तयार होताना ड) बुरशिजन्य रोगांचा नियमीत प्रतिबंध करा कारण या रोगांमुळे पाने कमी होऊन अन्नद्रव्ये तयार करण्यावर आणि अर्थातच फळाच्या विकासावर परिणाम होतो. इ) फळ काढणी अवस्थाही फळ तडकण्यामध्ये मुख्य भूमिका बजावते. जास्त पिकलेली फळे अंतर्गत समस्या(बिया खराब होणे) वा फळाची साल तडकणे सोपे करतात.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment