0


________________- ज्या चिक्कीवरुन महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ निर्माण झालं ती सूर्यकांता चिक्की अंशतः खराब असल्याची कबुली महिला व बालकल्याण विभागाने दिली आहे.   विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरात पंकजा मुंडे यांच्या मंत्रालयाने तशी कबुली दिली आहे. सूर्यकांता चिक्कीच्या दर्जाविषयी घेण्यात आलेल्या शंकेला यामुळं पुष्टी मिळाली आहे.   राज्यातील अंगणवाड्यांमध्ये वाटण्यात येणाऱ्या सूर्यकांता चिक्कीत ब्लेड सापडली होती. काही ठिकाणी बुरशी तर काही ठिकाणी चिक्कीत आळ्याही सापडल्या होत्या.   कथित चिक्की घोटाळ्यात स्वत: निर्दोष म्हणवणाऱ्या राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी कंत्राटं देताना चूक झाल्याचेही स्वीकारले आहे.   एक कोटींपेक्षा अधिक रुपयांच्या रेट कॉन्ट्रॅक्टला मनाई असतानाही चिक्की आणि खिचडीची कंत्राटं देऊन चूक झाली, असं पंकजा यांनी विधानसभेत शुक्रवारी प्रश्नोत्तराच्या काळात लेखी उत्तरात म्हटलं आहे.   पंकजा मुंडेंच्या विभागाने नियम धाब्यावर बसवून २०६ कोटींची कंत्राटं दिल्याचा आरोप विरोधक करत आहेत.   हायकोर्टात जनहित याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर नोटीस जारी करण्यात आली होती आणि यानंतर पंकजा मुंडे यांनी विधानसभेत लेखी उत्तर दिले.   हायकोर्टाने मुंडेंसह महिला आणि बालकल्याण विभागाचे सचिव स्वाधीन क्षत्रिय, बालकल्याण योजना आयुक्त आणि सात ठेकेदारांनाही नोटीस बजावली आहे.   पंकजा मुंडेच्या मते, हे काही प्रमाणात बरोबर आहे की, सरकारने रेट कॉन्ट्रॅक्ट सिस्टम बंद केली आहे. या सिस्टममध्ये मालाची किंमत आणि ठेकेदाराची निवड सरकारच निश्चित करते.   दरम्यान राज्य सरकारने एक कोटींपेक्षा जास्त रुपयांच्या कंत्राटात रेट कॉन्ट्रेक्ट सिस्टम एप्रिल महिन्यातच बंद केली होती. पण स्वत: पंकजा मुंडे यांनी जुन्याच फॉर्म्युल्यावर चिक्कीचं कंत्राटं दिल्याने त्या आणि सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत.   दरम्यान, आपण विधीमंडळात अशाप्रकारचं कोणतंही वक्तव्य केलं नाही. काही वृत्तपत्रात आलेली बातमी पूर्णत: चुकीची आणि दिशाभूल करणारी आहे. मी रेट कॉन्ट्रॅक्टमध्ये  चूक झाली असं सभागृहात म्हटलेलंच नाही, असा दावा पंकजा मुंडे यांनी केला आहे.
______________________

Post a Comment

 
Top