0

मंगळवेढा / तालुका प्रतिनिधी

आमदार भारत भालके यांना २00९ च्या निवडणूकीनंतर २0१४ मध्ये परत एकदा मंगळवेढेकरांनी भरघोस मते देवून विजयी केले आहे. यामुळे आ. भालके यांच्या समोर मंगळवेढा शहर व ग्रामीण भागाचा विकास करण्याची मोठी जबाबदारी पडली आहे. मंगळवेढा शहरामध्ये आत्तापर्यंत कसलाच विकास झालेला नाही. अजूनही मंगळवेढा शहराला मोठे खेडे म्हणून ओळखले जाते. शहराचा विकास करण्यासाठी शहरात अनेक स्पॉट आहेत. या शिवाय सांस्कृतिक व ऐतिहासिक पार्श्‍वभूमी असलेले हे शहर आहे. परंतू विकासाबाबत शहर संपूर्ण राज्यात सर्वाधिक मागे आहे. तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांनी मोठय़ा आशेने आ. भालकेंना भरभरुन मतदान केले आहे. आता आ. भालकेंनी मंजूर करुन आणलेले पाणी या भागाला मिळवून द्यावे लागणार आहे. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आहे. तर आ. भालके काँग्रेसचे प्रतिनिधीत्व करत आहेत. गेल्या निवडणूकीत ते अपक्ष होते. तर सरकार काँग्रेस प्रणित होते. खा. शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून त्यांनी विकास कामे केली व राजकीय स्नेह वाढविला. त्याचा फायदा झाला तो त्यातूनच. अख्या पश्‍चिम महाराष्ट्रात राज्यपालांकडून निर्बंध असताना ३५ गाव पाणी योजनेला नाहरकत पत्र मिळविले. ३५ गाव पाणी योजनेबरोबर भिमा नदीत बॅरेजेस, तामदर्डी बंधारा, पौट, पाठखळ येथे साठवण तलाव, शिरनांदगी तलावातील पाणी वितरणासाठी कालवे, डोंगरगाव तळसंगी तलाव कालव्यातून भरुन देणे, उजनीची अपुरी कामे ही सिंचनाची महत्वाची कामे आहेत. माचणूर पर्यटन क्षेत्रासाठी चालना देणे, मंगळवेढा शहरातील ब्रम्हदेवाच्या मुर्तीची पुनरप्रतिष्ठापना करणे, दामाजी, चोखामेळा, कान्होपात्रा, गोविंदबुवा, टिकाचार्य, बंका, निर्मळा, मोहनीबुवा आदी संतांचे संत साहित्य अभ्यासकांना उपलब्ध करुन देणे, सर्वांची स्मारके एकाच ठिकाणी उभी करुन भाविकांची व अभ्यासकांची सोय करणे. संत महात्मा बसवेश्‍वराचे स्मारक उभारणीसाठी जागा मिळविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. ते पुर्णत्वास नेणे, शहरात सर्व सुविधांयुक्त क्रीडा संकुल उभा करणे, त्यामध्ये ४00 मिटर धावण्याचा ट्रॅक, जलतरण तलाव, बॅडमिंटन कोर्ट, लॉनटेनिस कोर्ट उभे करणे, तालुक्यातील खेळाडूंच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी सुसज्ज असा कुस्तीचा आखाडा उभा करणे. शहरातील रस्ते करणे, स्वच्छता अभियान राबविणे, आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देणे, व्यापार उद्योग वाढीसाठी व्यापार्‍यांना सहकार्य करणे, शैक्षणिक हब उभा करणे, तरूणांसाठी औद्योगिक वसाहतीमध्ये प्रकल्प आणणे आदी बर्‍याच कामाचे त्यांच्या पुढे मोठे आव्हान आहे. आपल्या कार्यकुशल शैलीच्या जोरावर आ. भालके हे आव्हान लिलया पेलतील असा मंगळवेढेकरांना विश्‍वास वाटत आहे.

Post a Comment

 
Top