पंढरपूर / शहर प्रतिनिधी
विधानसभेच्या प्रचाराची धामधूम सुरू असतानाच कारमधून नेण्यात येणारी १ कोटी रूपयांची रक्कम स्थिर सर्व्हेक्षण पथकाने पकडली. पंढरपूर-सोलापूर मार्गावरील तीन रस्ता चौकात बुधवारी (दि.८) दुपारी ३ वाजता ही कारवाई करण्यात आली. निवडणूक काळात आचारसंहितेची येथे कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून शहरात येणार्या प्रमुख रस्त्यांच्या चौकात स्थिर सर्व्हेक्षण पथकांकडून प्रत्येक वाहनाची व्हिडीओ शुटींगसह कसून तपासणी करण्यात येत पैशाची देवाण-घेवाण होवू नये, तसेच इतर गैरप्रकार घडू नयेत यासाठी ही तपासणी केली जात आहे. येथील तीन रस्ता चौकात बुधवारी दुपारी ३ वाजता सोलापूरहून आलेली इंडिका कार (एम.एच.४५/एन.७४७४) स्थिर सर्व्हेक्षण पथक प्रमुख सुधीर कोकणे यांनी अडवून तपासणी केली असता दोन पोते व एका सुटकेसमध्ये भरून नोटा आणल्याचे निदर्शनास आले. ही सर्व रक्कम १ कोटी रूपये असल्याचे निष्पन्न झाले. यासंदर्भात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांच्याशी संपर्क साधण्यात येऊन ही गाडी तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली. तहसील कार्यालयाने आयकर विभागाला याबाबत माहिती कळवून रक्कमेबाबत चौकशी करण्याच्या सूचना दिल्याचे नायब तहसीलदार एम.पी. मोरे यांनी सांगितले. दरम्यान ही रक्कम सोलापूर येथील बँक ऑफ इंडिया शाखेतून माळशिरस शाखेसाठी पाठविण्यात आल्याचे रात्री उशिरा सांगण्यात आले. तसेच अधिक चौकशी सुरू असल्याचेही सांगण्यात येत होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment