0

मंगळवेढा / तालुका प्रतिनिधी
पाणी टंचाईवर मात करीत मोठय़ा कष्टाने जपलेल्या टोमॅटोला सध्या कवडीमोल किंमत मिळत असल्याने तालुक्यातील शेतकरी अडचणीत आले आहेत. विशेषत: खुपसंगी परिसरात टोमॅटे, डाळिंब याचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर घेतले जाते. दरातील घसरणीमुळे उत्पादक धास्तावले आहेत. द्राक्ष, डाळिंब उत्पादन करून खुपसंगीकरांनी तालुक्यात लौकीक मिळविला आहे. अत्यल्प पाण्यावर फळबाग करून त्या जगविल्या व त्यातून निर्णायक यश मिळविले. 'दामाजी'चे माजी संचालक स्व. रंगातात्या गडदे यांनी खुपसंगीच्या माळावर द्राक्ष व डाळिंब लावून बागा यशस्वी करून दाखविल्याचा आदर्श परिसरातील शेतकर्‍यांसमोर आहे. पाण्याच्या अडचणीतही या भागातील शेतकर्‍यांनी चालू वर्षी टोमॅटोचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेतले आहे. परंतु टोमॅटोला दर मिळत नसल्यामुळे उत्पादक हवालदिल झाला आहे. दोन व तीन रुपये किलोने टोमॅटोला मागणी आली आहे. केलेला खर्चही निघत नाही. नुसते टोमॅटो तोडणीचा खर्चसुद्धा निघत नाही. या प्रकाराने खुपसंगीतील टोमॅटो उत्पादक कमालीचे हवालदिल झाले आहेत. टोमॅटो लावल्याबद्दल पश्‍चाताप करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

Post a Comment

 
Top