राणी वाघमारे खून प्रकरण
मंगळवेढा / तालुका प्रतिनिध बोराळे (ता. मंगळवेढा) येथे मुलगा होत नाही या निराशेपोटी बाजीराव वाघमारे याने आपल्या पत्नीचा धारधार शस्त्राने निर्घृण खून केला. याबाबत मंगळवेढा पोलीसांनी बाजीराव वाघमारे यास अटक करुन शुक्रवारी मंगळवेढय़ाचे दिवाणी व फौजदारी न्यायाधिश डी.एन. खेर यांच्या समोर उभे केले असता न्यायालयाने त्यास सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पत्नीला पाच मुली झाल्या आहेत, मुलगा होत नाही यामुळे पती बाजीराव वाघमारे हा कमालीचा निराश होता. सहाव्या वेळी पत्नी गर्भवती असताना तिची अवैधरित्या गर्भ तपासणी करण्यात आली. यामध्ये मुलगी असल्याचे समजल्यामुळे पती बाजीराव हा संतप्त झाला होता. यातून त्याने पत्नीला अधिक त्रास देण्यास सुरूवात केली होती. मुलगा होत नाही यामुळे सतत नैराश्य आल्यामुळे गुरुवारी पहाटे आरोपी बाजीराव वाघमारे याने पत्नी राणी वाघमारे हिचा लोखंडी विळ्याच्या सहाय्याने सपासप वार करून निर्घृण खून केला होता. खून करून प्रेताजवळच कांबळ पांघरून तो बसला होता. अतिशय निर्दयीपणे व माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य त्याने केले. याबाबतचा तपास करण्यासाठी स्वत: पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांनी न्यायालयात हजर राहुन कागदपत्रे सादर केली. सरकारी वकील भैरवी मोरे यांनी सात दिवसाची पोलीस कोठडी मागितली. अधिक तपास करण्यासाठी न्यायालयाने आरोपी बाजीराव वाघमारे यास सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तीन डिसेंबर पर्यंत वाघमारे यास आता पोलीस कोठडीत रहावे लागणार आहे.
पोलीस तपासात बाजीराव वाघमारे याने खून कसा केला? का केला? याबद्दलची अधिक माहिती मिळणार आहे. याचबरोबर या खून प्रकरणी आरोपी बाजीराव वाघमारे हा एकटाच जबाबदार आहे की त्याला मदत करण्यासाठी किंवा फूस लावण्यासाठी आणखी कोण होते का? हे आता तपासाधिकारी तथा पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांना पहावे लागणार आहे. मात्र, या खून प्रकरणामुळे मंगळवेढा तालुक्याच्या नावाची बदनामी झाली आहे. अनेक साधू-संत होऊन गेलेल्या मंगळवेढा तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडल्याने मंगळवेढेकरांची मान खाली गेली आहे.
Post a Comment