पंढरपूर तालुक्यात तलाठय़ावरील तिसरी कारवाई
पंढरपूर / शहर प्रतिनिधी
शेतजमिनीची खरेदीखत व हक्कसोड पत्राप्रमाणे नोंद लावून ७/१२ उतारा देण्यासाठी १७ हजार रूपयांची लाच स्वीकारताना पुळूज (ता.पंढरपूर) येथील गाव कामगार तलाठय़ाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. शनिवारी (दि.२९) दुपारी तलाठी कार्यालयातच ही कारवाई करण्यात आली. गेल्या कांही दिवसात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळय़ात सापडलेला हा तिसरा तलाठी ठरला आहे. धवलू काशिनाथ ठाकरे असे लाचखोर तलाठय़ाचे नांव आहे. पुळूज येथील तक्रारदाराने शेतजमिनीच्या खरेदीखत आणि हक्कसोड पत्राप्रमाणे ७/१२ उतार्यावर नोंद करण्याची विनंती तलाठी ठाकरे याच्याकडे केली होती. मात्र या कामासाठी ठाकरे याने २0 हजार रूपये लाचेची मागणी केली. तडजोडीने १७ हजार रूपये देण्यास तक्रारदार तयार झाला. दरम्यान तक्रारदाराने २८ नोव्हेंबर रोजी यासंदर्भात सोलापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक एस.बी. साळुंखे यांच्या पथकाने शनिवारी (दि.२९) दुपारी पुळूज येथील तलाठी कार्यालयात सापळा रचला. त्यानुसार तक्रारीच्या अनुषंगाने तक्रारदार यांनी तलाठी ठाकरे याची समक्ष भेट घेतली. यावेळी तक्रारदाराकडून १७ हजार रूपयांची लाच स्वीकारताना तलाठी ठाकरे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांनी तात्काळ रंगेहात पकडले. भरदुपारी ही कारवाई झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. हा प्रकार पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाली होती. रात्री उशिरापर्यंत तलाठी ठाकरे याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. गेल्या कांही दिवसांत पंढरपूर तालुक्यातील ३ लाचखोर तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळय़ात सापडले आहेत. यापूर्वी तुंगत येथील तलाठी या सापळय़ात अडकला होता. नुकतेच आव्हे येथील तलाठी बाळासाहेब मुडके आणि कोतवाल चंद्रकांत कांबळे या दोघांना लाच घेताना पकडण्यात आले होते. यामध्ये मुडके याच्यावर निलंबनाची कारवाईही झाली आहे. त्यानंतर आता पुळूजचा तलाठी ठाकरे याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.
Post a Comment