0

संशयित रूग्णांचा अहवाल बाकी; ९८८ घरांमध्ये आढळल्या डासांच्या अळय़ा
पंढरपूर / शहर प्रतिनिधी
शहरात डेंग्युच्या पार्श्‍वभूमिवर नागरी हिवताप योजनेअंतर्गत हाती घेण्यात आलेल्या कंटेनर सर्व्हेमध्ये तब्बल ९८८ घरांमध्ये डासांच्या अळय़ा सापडल्या आहेत. दरम्यान रक्त नमुने तपासणीसाठी पाठविलेल्या १९ संशयित रूग्णांपैकी दोघांना डेंग्यू झाल्याचा अहवाल प्राप्त झाला असून आणखी ८ जणांचा अहवाल मिळालेला नाही. कार्तिकी यात्रेच्या सोहळय़ानंतर शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. यातच रिमझीम पावसाने अधूनमधून हजेरी लावल्याने डासांची प्रचंड उत्पत्ती झाली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी डेंग्यू आणि डेंग्युसदृश्य रूग्ण आढळल्याने शहरातीलही आरोग्य विभागाला जाग आली. त्यानंतर गेल्या २८ ऑक्टोबरपासून शहरात नागरी हिवताप योजनेअंतर्गत कंटेनर सर्व्हे सुरू करण्यात आला. घरोघरी जाऊन पाणीसाठय़ांची तपासणी करणे, पाणीसाठे रिकामे करणे, प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी, धुरळणी करणे अशी मोहीम हाती घेण्यात आली. मात्र अपुर्‍या कर्मचार्‍यांमुळे हे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. याविषयी शहरवासियांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान कंटेनर सर्व्हेअंतर्गत संशयित १९ रूग्णांच्या रक्ताचे नमुने घेऊन तपासणीसाठी सोलापूर येथे पाठविण्यात आले होते. त्यापैकी ११ जणांचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये सेंट्रल नाका झोपडपट्टी येथील रहिवाशी राजेंद्र सुधाकर शिंगे व महेश राजेंद्र शिंगे या दोघांना डेंग्यू असल्याचे निष्पन्न झाले आहे. आणखी ८ जणांच्या रक्त तपासणीचा अहवाल प्राप्त झाला नसल्याचे नागरी हिवताप योजनेचे प्र.जीवशास्त्रज्ञ डी.एफ. गजाकोश यांनी सांगितले. कंटेनर सर्व्हेमधून आजअखेर एकूण १९ हजार ४४१ घरांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी तब्बल ९८८ घरांमधील १ हजार १३ पाणी साठय़ांमध्ये डासांच्या अळय़ा आढळून आल्या आहेत. त्यामुळे सध्या शहरभर औषधांची फवारणी, धुरळणी सुरू करण्यात आली आहे. डासांच्या अळय़ा सापडलेले पाणीसाठे रिकामे करून त्यामध्येही औषधे टाकण्यात आली आहेत. या मोहिमेसाठी ३0 हंगामी कर्मचार्‍यांची मदत घेण्यात येत आहे. डासांच्या अळय़ा आढळून आलेल्या ठिकाणच्या नागरिकांना अधिक दक्षता घेण्याच्या सूचना नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिल्या आहेत. शहरात अनेक ठिकाणी डासांच्या अळय़ा सापडत असताना दोघांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाल्यामुळे शहरवासियांमध्ये खळबळ उडाली आहे. स्वच्छता आणि डेंग्यूच्या प्रतिबंधासाठी राबविण्यात येत असलेल्या मोहिमेला आणखी गती देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

Post a Comment

 
Top