-----------------------------------------
✒ बसवेश्वर बेडगे / सोलापूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे बालस्वयंसेवकांचे शानदार संचलन
रविवारी सायंकाळी शहरातून काढण्यात आले. या शिस्तबद्ध संचलनाचे
नागरिकांनी ठिकठिकाणी फुले उधळून, रांगोळ्या काढून स्वागत केले.
बालस्वयंसेवकांना संचलनाचा सराव व्हावा याकरीता या संचलनाचे आयोजन
करण्यात आले होते. दत्त चौकातील स.हि. ने. श्री सरस्वती मंदिर प्रशालेतून
सायंकाळी पाच वाजता संचलनास प्रारंभ झाला. प्रारंभी प्रार्थना म्हणण्यात
आली. यानंतर संचलनास सुरूवात झाली. अग्रभागी भगवा ध्वज घेतलेला अश्वारूढ
बालस्वयंसेवक होता. दोन घोष पथकांसह हे शिस्तबद्ध संचलन काढण्यात आले.
दत्त चौकातून सुरू झालेले हे संचलन राजवाडे चौक, चौपाड विठ्ठल मंदिर,
शिवस्मारक, काळी मशीद, लोणारी गल्ली, चौपाड बालाजी मंदिर, पंजाब तालीम,
श्री मल्लिकार्जुन मंदिर, कुंभार वाडा, जुने विठ्ठल मंदिर, जोशी गल्ली,
टिळक चौक, कुबेर गल्ली, बागेवाडीकर दवाखाना, जुनी फौजदार चावडी, सोन्या
मारूती, दत्त चौकमार्गे पुन्हा स. हि. ने. सरस्वती मंदिर प्रशालेत समाप्त
करण्यात आले. संचलन मार्गावर राजवाडे चौक, चौपाड, शिवस्मारक, लोणारी
गल्ली, मल्लिकार्जुन मंदिर, टिळक चौक, सोन्या मारूती आदी अनेक ठिकाणी
फुले उधळून, रांगोळ्या काढून संचलनाचे स्वागत करण्यात येत होते.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक दामोदर दरगड, विभाग
कार्यवाह अशोक संकलेचा, जिल्हा कार्यवाह रंगनाथ बंकापूर, शहर कार्यवाह
व्यंकटेश कैंची आदी उपस्थित होते.
--------------------------------------------
Post a Comment