0

.मंत्रालयात अधिकाऱ्यांच्या भेटीगाठीत रंगलीय चर्चा मुंबई - नव्या सरकारने कामकाज सुरू केले असले तरी अधिकाऱ्यांत मात्र, ‘काय साहेब, कुणाकडे.. काय म्हणून..‘ या एकाच प्रश्‍नांची उजळणी सध्या मंत्रालयात होत आहे. राष्ट्रपती राजवटीनंतर मंत्री कार्यालयातून हटवलेले अधिकारी अजूनही अधांतरीच आहेत. नव्या सरकारने बैठकांचा रतीब सुरू केला; पण "वेटिंग लिस्ट‘वर असलेल्या अधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्या मात्र अधांतरीच असल्याने कित्येक अधिकारी इकडून तिकडे बिनकामी चकरा मारत आहेत. राष्ट्रपती राजवट लागू होण्याअगोदर मुख्यमंत्री कार्यालय, उपमुख्यमंत्री कार्यालय तर कायम गजबलेले असायचे. मात्र, नव्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री हे पदच रिक्‍त असल्याने या कार्यालयातील अनेक अधिकारी आवडीची जागा मिळावी, यासाठी धावपळ करत आहेत. मंत्री कार्यालयातील बहुतांश अधिकारी प्रतिनियुक्‍तीवर होते. राष्ट्रपती राजवटीनंतर हे सर्व अधिकाऱ्यांना त्यांच्या मूळ केडरमध्ये पाठविण्यात आले; पण मूळ केडरमध्ये अनेक जागा रिक्‍त नसल्याने या अधिकाऱ्यांना कामाची जबाबदारीच मिळालेली नाही. त्यामुळे, प्रतीक्षा यादीतील हे अधिकारी दिवसभर मंत्रालयात फिरताना दिसत आहेत. नव्या सरकारने मंत्रालयात कामकाज सुरू केले आहे; पण अधिकाऱ्यांमधे मात्र "काय, सध्या कुठे? कोणाकडे. कोणत्या ठिकाणी. काय म्हणून?‘ अशी विचारणा मंत्रालयात कानावर पडत आहेत. काम करणारे थोडे अन्‌ पळणारे अधिकारीच अधिक असल्याचा टोलाही काही जण एकमेकांना लगावताना दिसत आहेत. त्यातच मंत्री कार्यालयात रुजू झालेल्या अधिकाऱ्यांना पाहिल्यानंतर अभिनंदन केल्यास, "काय राव.. तात्पुरती नेमणूक आहे. काय माहीत साहेब कायम ठेवतील की नाही ते...‘ असे आपसुक शब्द त्यांच्या तोंडी ऐकायला मिळत आहेत. सरकार नवे, अधिकारी नवे असे चित्र सध्या मंत्रालयात आहे. आघाडी सरकारच्या मंत्र्याकडे असलेले अधिकारी, खासगी सचिव, सहायक यांना पुन्हा मंत्री कार्यालयात घेवू नये असे निर्देश देण्यात आले आहेत; पण या पूर्वीच्या काही मंत्र्यांकडील अधिकाऱ्यांच्या मदतीनेच नव्या मंत्र्यांनी कामकाज सुरू ठेवले आहे; पण या अधिकाऱ्यांना सामान्य प्रशासन विभागाने नियुक्‍ती पत्र दिले नसल्याने हे अधिकारीदेखील अधांतरीच असल्याची चर्चा मंत्रालयात रंगली आहे.

Post a Comment

 
Top