0

सध्या डाळिंब बागांमध्ये रस शोषणार्‍या किडीबरोबरच इतर किडींचाही प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात आढळतो. किडींच्या वाढीसाठी गेल्या आठवड्यातील ढगाळ व अवकाळी पावसाचे वातावरण पोषक असेच आहे. तेव्हा या किडींच्या बंदोबस्तासाठी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. मावा : मावा या किडीचा प्रादुर्भाव नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत आढळतो. छाटणीनंतर नवीन पालवी फुटत असताना मावा ही कीड मोठय़ा प्रमाणात येते. मावा किडे एक ते दोन मिमी लांबीचे असतात. मऊ शरीर असते. शेपटीकडील बाजूला शिंगासारखी दोन टोके असतात. ही कीडे पांढरट, हिरव्या रंगाची असतात. मावा कीड झाडांचे कोवळे शेंडे, पाने, फुले, कळी तसेच फळांमध्ये सोंड घालून रस शोषून घेतात. या किडीच्या प्रादुर्भावामुळे डाळिंबाची पाने वेडीवाकडी गुंडाळल्यासारखी होतात. ही कीड मधासारखा पदार्थ बाहेर टाकते. त्यामुळे पानांवर काळा थर जमा होतो. व अन्न तयार करण्याची प्रक्रिया मंदावते. मावा किडीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट (३0 ईसी) २ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे. पांढरी माशी : पांढरी माशी ही कीड पांढर्‍या रंगाची असते. शक्यतो पानाखालील भागात आढळते. पांढर्‍या माशीची पिले व पूर्ण वाढ झालेल्या माशा पानाच्या खालच्या बाजूने पानांतील रस शोषतात. त्यामुळे पाने वेडीवाकडी गुंडाळलेली दिसतात व कालांतराने पिवळी पडून वाळतात. ही कीड देखील पानांवर गोड, चिकट द्रव सोडत असल्यामुळे या चिकट द्रवामुळे बुरशीची वाढ होते व ही काळी बुरशी प्रकाश संश्लोषण कार्यात मोठा अडथळा निर्माण करते. या किडीच्या बंदोबस्तासाठी ड्रायअँझोफास (४0 ईसी) दीड मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फुलकिडे : हे आकाराने लहान असून शरीर लांबट निमूळते असते. फिक्कट पिवळ्या रंगाचे असतात. या किडीच्या पाठीवर काळ्या रंगाचे दोन पट्टे असतात. प्रौढ फुलकिडे पाने, फुले, पाकळे व फळांवर चिरा पाडतात. त्यातून स्त्रवणारा रस शोषून घेतात. फळांवर चट्टे पडतात. व काही कालावधीनंतर फळांवर हे चट्टे गंज आल्यासारखे दिसतात. फळांची प्रत खराब होते. डाळिंबामध्ये फुलधारणा ते फळकाढणीपर्यंतच्या काळात फुलकिड्यांचा प्रादुर्भाव केव्हाही दिसून येतो. फुलकिड्यांची लागण होताच थायमेथोक्झाम (२५ डब्ल्यूजी) किंवा अँसिटामिप्रीड (२0 एस पी) तीन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पिठय़ा ढोकूण : झाडांची कोवळी पाने, फुले, कळी आणि फळांवर मेणाचे आवरण असलेली पांढर्‍या रंगाची पिले व प्रोढ किडे पुंजक्यामध्ये आढळतात. एकाच ठिकाणी स्थिर राहून रस शोषण करतात. या किडीचा जास्त प्रादुर्भाव झाला तर फुले, फळे गळून पडतात. फळांवर मेणासारखे तेलकट आवरण दिसते. त्यामुळे फळाचा दर्जा खालावतो व भाव कमी मिळतो. या किडीच्या बंदोबस्तासाठी बाग तणविरहित ठेवणे आवश्यक आहे. तसेच क्लोरपायरिफॉस (२0 ईसी) दोन मिली व फिश ऑईल रोझीन सोप(२ मिली) प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. अशापद्धतीने रस शोषणार्‍या किडींचा बंदोबस्त करुन डाळिंबाच्या बागेचे व्यवस्थित व्यवस्थापन केल्यास नुकसान टळेल. - अजित परबत, ९९२१६६0१५१

Post a Comment

 
Top