0
सोलापूर / प्रतिनिधी
 गेल्या अनेक दिवसापासून पर्यावरण विभागाच्या कचाट्यात अडलेल्या वाळू लिलावाला अखेर मंजुरी मिळाली असून जिल्ह्यातील ५0 वाळू साठय़ांसाठी ६ जानेवारी रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत ई-लिलाव होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिली. दोन आठवड्यापूर्वी पर्यावरण विभागाकडून हिरवा कंदिल मिळाल्यानंतर आता जिल्ह्यातील ५0 वाळू साठय़ांच्या लिलावासाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. एकूण २३ लाख ब्रास वाळूचा लिलाव होणार आहे. जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे अणि गौण खनिजचे उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी तयार केलेल्या मॉस्टर प्लॅनला पर्यावरण विभागाची मंजुरी तर मिळालीच, पण राज्यभर सोलापूर पॅटर्न वापरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. २३ ते ३१ डिसेंबर या कालावधीत ऑनलाईन नोंदणी सुरु राहणार आहे. तसेच २३ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान नोंदणी केलेल्यांनी महसूलचे उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांच्याकडे ऑनलाईन नोंदणीत दाखल केलेली सर्व कागदपत्रे प्रत्यक्षात सादर करावेत. २४ डिसेंबर ते ३ जानेवारीपर्यत ऑनलाईन पद्धतीने निविदा जमा करावेत. ५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता ई-निविदा भरलेल्या निविदाधारकांना ई-ऑक्शनसाठी ऑनलाईन पद्धतीने संगणकीय प्रणालीमध्ये वेबसाईटवर खुली करुन देण्यात येईल, ६ जानेवारी रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत ई-लिलाव होणार आहे. त्यानंतर ७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात लिलावाबाबत अंतिम निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. यामध्ये अक्कलकोट तालुक्यातील ६, दक्षिण सोलापूर तालुक्यातील १३, पंढरपूर तालुक्यातील ६, माढा तालुक्यातील ३, माळशिरस तालुक्यातील २, करमाळा तालुक्यातील ३, सांगोला १0, पंढरपूर- माळशिरस संयुक्त २, पंढरपूर-माळशिरस १, माढा-माळशिरस २, मोहोळ-मंगळवेढा २ असे एकूण ५0 वाळूसाठय़ाचे ई-लिलाव होणार आहेत. सर्वात मोठा वाळू साठा मोहोळ तालुक्यातील घोडेश्‍वर व मंगळवेढा तालुक्यातील तामदर्डी येथील आहे. या संयुक्त साठय़ात एक लाख २५ हजार ८८९ ब्रास वाळू असून याची लघुत्तम किंमत १५ कोटी ११ लाख रुपये इतकी आहे. सर्व वाळू साठय़ावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून अवैध वाळू उपसा थांबविण्यासाठी मोबाईल एसएमएस सेवा सुरु करण्यात आली आहे. अतिशय पारदर्शतेने वाळू लिलाव होणार असून वाळू उपशावरही करडी नजर राहणार असल्याचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी सांगितले. 

Post a Comment

 
Top