0

मंगळवेढा / तालुका प्रतिनिधी
कायम दुष्काळी मगळवेढा तालुक्यात यंदा चार साखर कारखाने सुरु आहेत. दामाजी, फॅबटेक, भैरवनाथ, युटोपियन या चार कारखान्यांमुळे ऊस उत्पादकांचा प्रश्न सुटला आहे यावर्षी तालुक्यात गळीत हंगाम उशीरा सुरु झाला असला तरी सर्वच साखर कारखान्यांचे गाळप हंगाम वेळापत्रकानुसार सुरू असल्याचे चित्र आहे. यंदा ऊसाचे पिक मोठय़ा प्रमाणावर आहे. तालुक्यात चार साखर कारखाने सुरू झाले असले तरी अद्याप सातव्या महिन्यातला ऊस तोडला जात आहे. २६५ ला हात लावण्याची तयारी नाही, तर अन्य दोन कारखान्यात ऊस नेण्याचे प्रमाण वाढले आहे. तर 'युटोपियन' हा 'पांडुरंग'चा भाऊ असल्यामुळे नोंदीशिवाय ऊस घेण्यास तयार नाही. या उपर ऊसाची रिकव्हरी मोजण्याची तयारी असल्यामुळे कार्यकर्त्याला नव्हे तर नेत्याला सुद्धा ऊस तोडणीमध्ये घुसखोरी करु दिली जात नसल्याचे सांगितले जात आहे. एकूणात तालुक्यात ऊसाचे क्षेत्र अधिक झाले आहे. यामुळे ऊस उत्पादकाला आपला ऊस कधी एकदा तोडून कारखाना नेईल, असे वाटू लागले आहे. यामुळे ऊस उत्पादक कारखान्यावर चकरा मारु लागले आहेत. संचालक, चेअरमनला भेटण्याचे प्रमाण वाढले आहे. पहिली उचल अद्याप जाहीर झाली नाही, तरी देखील 'दामाजी'ला ऊस देण्याचे प्रमाण अचंबित करणारे आहे. श्रीपूरच्या 'पांडुरंग'ने उचल जाहीर करून माघार घेतली असली तरी युटोपियन, फॅबटेक, भैरवनाथने अद्यापही उचल जाहीर केली नाही. परंतू प्रा. शिवाजी सावंत व भाऊसाहेब रुपनवर यांनी इतर कारखान्यांप्रमाणे दर देण्याचे मान्य केले आहे. यामुळे उमेश परिचारक यांच्या 'युटोपियन' शुगरकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

 
Top