0

मंगळवेढा / तालुका प्रतिनिधी
शहराच्या विकास कामासाठी सुमारे आठ कोटी रुपयाचे अनुदान राज्यशासनाने उपलब्ध करुन दिले आहे. यामुळे शहरात अनेक विकासाची कामे लवकर सुरु होणार आहेत. पालिकेने सर्वसाधारण सभेत विकास कामांना मंजूरी दिली आहे. पालिकेकडे सध्या तीन अभियंते उपलब्ध आहेत. पाणी पुरवठा, बांधकाम यासाठी दोन स्वतंत्र इंजिनिअर उपलब्ध झाल्यामुळे पालिकेच्या विकास कामाला गती येणार आहे. आमदार भारत भालके यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षा अरुणा दत्तू, उपनगराध्यक्ष भारत नागणे हे सर्वनगरसेवकांना बरोबर घेवून विश्‍वासाने काम करत आहेत. यामुळे राज्य शासनाकडून उपलब्ध झालेले आठ कोटी रुपयाचे अनुदान शहरातील विविध विकास कामासाठी वापरले जाणार आहे. ज्या विषयांना मंजूरी मिळाली आहे त्या ठिकाणी आता ठेकेदार नेमून या कामाला सुरुवात होणार आहे. रस्ते, पाणी, गटारी, व्यापार संकूल, शौचालय यासाठी हा निधी खर्च केला जाणार आहे. यामुळे शहरातील नागरिकांना प्राथमिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. शहर स्वच्छता, शहराला स्वच्छ पाणी देण्यासाठी नगराध्यक्ष अरुणा दत्तू कटिबद्ध आहेत. सत्ताधारी गटाने विरोधी गटाला विरोधक न मानता विकास कामात सहकार्य घेवून कामकाज करण्यास सुरुवात केली आहे.

Post a Comment

 
Top