मंगळवेढा तालुक्यातील भोसे गावासह ३९ गावासाठी सुरू असलेली प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना सध्या चर्चेचा विषय बनत आहे. सांगोल्याप्रमाणेच मंगळवेढय़ाच्या या दुष्काळी भागातील जनतेची तहान भागविण्यासाठी भविष्यात ही योजना वरदाण ठरेल, यात तिळमात्र शंका नाही. या भागाला दरवर्षी उन्हाळ्यात जवळपास पाच महिने पाण्याची भीषण टंचाई भासते. यावरती शासनाने मार्ग काढून या प्रास्तावित गावांचा अहवाल मागविला व या चाळीस गावांसाठी टँकरने पाणीपुरवठा केला. टँकरचा वापर करूनही पाण्याचा प्रश्न सुटला नाही. कारण, टँकरच्या अपुर्या खेपा, असुविधा, लांब पल्ला, गळके टँकर यामुळे लोकांची गैरसोय होऊन अपुरे पाणी मिळते. यामुळे पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनला होता. सध्या पाण्यासाठी लोकांना कोसो दूर जावे लागत आहे. पाणी आणायला गेल्यानंतर काही लहान मुलांना जीव गमवावा लागल्याच्याही घटना घडल्या. या सगळ्या गोष्टींचा विचार करून आ. भारत भालके यांनी ही योजना मंजूर करून घेतली. शेजारच्या सांगोला तालुक्यात जर अशा प्रकारची योजना यशस्वी झाली तर आपणही ही योजना राबवू शकतो. या विचाराने राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत भोसे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता मिळवून घेतली. या योजनेचा मुख्य उद्देश कायमस्वरुपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणे हा आहे. या योजनेअंतर्गत २0११ च्या जनगणनेनुसार विचार करून भविष्यातील २0३0 असणार्या लोकसंख्येला पाणीपुरवठा व्हावा हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेऊनच ही योजना तयार करण्यात आली आहे. यासाठी या योजनेच्या ४ हजार ५७७ एवढा दरडोई खर्च आहे. यासाठी ७१ कोटी १७ लाख ३१ हजार रूपये ढोबळ किंमतीच्या आराखड्यास अंतिम प्रशासकीय मान्यता राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने देऊन निधीही दिला आहे. यासाठी भीमा नदीवर उचेठाण (ता. मंगळवेढा) याठिकाणी बंधारा बांधण्यात येणार आहे. या बंधार्यासाठी शासनाने २५ कोटी रूपयांचा निधी दिला आहे. या बंधार्यातून पाणी उपसा करून जुनोनी (ता. मंगळवेढा) येथे जलशुद्धीकरण केंद्र उभे केले जाणार आहे. या प्रादेशिक योजनेअंतर्गत झोनप्रमाणे गावांना पाणीपुरवठा केला जाईल. या अहवालाद्वारे तीन झोन तयार केले असून झोन ए व झोन बी असे दोन टप्पे तयार करण्यात आले आहेत. नंदेश्वर झोन, गोणेवाडी झोन व भुयार झोन असे तीन झोन तयार केले आहेत. झोन १ ए मध्ये पाठखळ, खुपसंगी, लेंडवेचिंचाळे, गोणेवाडी, शिरशी, डोंगरगाव, जुनोनी या गावाचा समावेश असून झोन १ बी मध्ये खडकी, मेटकरवाडी, हाजापूर, हिवरगाव या चार गावांचा समावेश आहे. या झोन १ द्वारे संतुलन टाकी गोणेवाडी क्षमता २.३५ लक्ष लि. इतकी आहे. झोन २ नंदेश्वर संतुलन टाकी क्षमता ५.४0 लक्ष लि. आहे. झोन २ ए मध्ये नंदेश्वर, सिद्धनकेरी, जालिहाळ, भाळवणी या चार गावांचा समावेश आहे तर झोन २ बी मध्ये भोसे, हुन्नूर, मानेवाडी, शिरनांदगी, महमदाबाद (हु), लोणार, पडोळकरवाडी, रड्डे, निंबोणी, जित्ती, खवे, चिक्कलगी, बावची या गावाचा समावेश आहे. झोन ३ भुयार संतुलन टाकी क्षमता २.४५ लक्ष लि. एवढी आहे. झोन ३ ए मध्ये जंगलगी, पौट, हुलजंती, माळेवाडी व झोन ३ बीमध्ये मारोळी, लवंगी, सलगर खुर्द, आसबेवाडी, शिवनगी, सलगर बुद्रूक, येळगी, सोड्डी इ. १२ गावांचा समावेश आहे. अशा प्रकारची ही अत्यंत महत्त्वपूर्ण योजना मंगळवेढा तालुक्यातील या एकूण चाळीस गावांसाठी एक वरदानच ठरणार आहे. यासाठी तालुक्यातील सर्व गावकर्यांनी व लोकप्रतिनिधींनी ही योजना यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. ही योजना यशस्वी झाली तर या दुष्काळी गावांचा कायमचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. या योजनेच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम नुकताच नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथे पार पडला. या कार्यक्रमात आ. भालके यांनी संबंधित अधिकार्यांना व ठेकेदाराला एक वर्षाच्या आत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे काम पूर्ण झाल्यास दुष्काळी गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटेल.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment