0
सत्तेच्या दाटक्या खुराड्यात अनेकवेळा येरझारा करुन अंगावरची पंखं गेली; परंतु शेवटच्या घटकेपर्यंत मंत्रीपद मिळालेच नसल्याने 'स्वाभिमानी शेतकरी संघटने'ची अवस्था भुंड्या कोंबड्यासारखी झाली आहे. ऊस दर आंदोलनाच्या निमित्ताने सोलापूर जिल्हय़ात 'कासव' गतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पदार्पण केले. जिल्हय़ातील सत्ताधीश राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील 'दुही'चा मोठय़ा खुबीने वापर करत स्वाभिमानीच्या 'कबुतराने' कधी हा तर कधी तो अशी तारेवरची कसरत करत कार्यकर्त्यांत जम बसविला. शेतकर्‍यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असणारा 'ऊस दर' आंदोलन संघटनेने हाताळल्याने त्यांना चांगला सर्मथक वर्ग एकत्र करता आला. पुढे पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने मतांची गोळा बेरीज करत परिचारक गटाशी राजकीय तह करुन संघटनेने पंढरपूर पंचायत समितीत सत्तेचा वाटा मिळविला. संघटनेच्या माध्यमातून विष्णू बागल यांच्यासारखा खरा शेतकरी उपसभापती झाला. कुसूम बगाडे यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचा उंबरठा ओलांडला. शासन विरोधी शेतकरी असा ऊस दर आंदोलनाच्या निमित्ताने संघर्ष पुढे पेटत गेला, याचे नेतृत्व अर्थातच स्वाभिमानीने केले. यात अनेक शेतकर्‍यांची डोकी फुटली. सर्वसामान्य शेतकर्‍यांची पोरं तुरुंगात गेली. पंढरपूर ते बारामती पायी आंदोलन करुन संघटनेने ऊस दर पदरात पाडून घेतला. इथपर्यंत संघटनेची कारकीर्द यशस्वी ठरली. स्वाभिमानीच्या कर्त्यांकडून काही घडलेले अपवाद शेतकर्‍यांनी पदराआड करुन त्यावर दुर्लक्ष केले. मात्र कधी माढेकरांचा पदर धरुन अकलूजकरांना तर कधी अकलूजकरांचा पदर धरुन माढेकरांना सतत डिवचत राहण्याचा बिनबोभाट उद्योग स्वाभिमानीच्या दुसर्‍या फळीतील नेत्याने सतत केला. कारखानदारांच्या विरोधात आंदोलनं करायची अन् संघटना त्यांच्याच मर्जीने चालवायची यावर संघटनेतील अनेक मान्यवरांनी बैठकीमध्ये खुला आवाज उठविला. त्या आवाज उठविणार्‍यांची पदे काढून घेण्याचा सपाटा लावण्यात आला. यात अनेक कार्यकर्त्यांचा राजकीय बळी गेला आणि येथूनच संघटनेच्या मुखवट्यातील प्रकाशाचा शुभिवंत नूर उतरत गेला. पुढे बळीराजाच्या प्रश्नासाठी लढणारी संघटना म्हणून परिचित स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राजकीय वेध लागले. संघटना मूळ उद्देशापासून दूर जात राहिली. यामुळे अनेकांनी स्वाभिमानाने मिरवलेले छाताडावरचे संघटनेचे लाल बिले उतरविले. सदाभाऊ खोत माढा लोकसभेच्या भोवल्यावर चढले. संघटना महायुतीत प्रवेशती झाली. माढा लोकसभा मतदारसंघात विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. मात्र देशात मोदी करिश्मा चालला. केंद्रात नेमका नेम बसला नसल्याने 'विधानसभा लक्ष' ठरवून स्वाभिमानी कामाला लागली. विधानसभा निवडणुकीत पूर्वी महायुतीत उभी फूट पडली. मात्र मोदी लाट गृहीत धरुन स्वाभिमानी भाजप सोबतच राहिली. निवडणुकीत कार्यकर्त्यांचा विरोध झुगारुन तिकिट वाटप करण्यात आले. त्यामुळे सोलापूर जिल्हय़ातील पंढरपूर व करमाळा मतदारसंघात स्वाभिमानी भुईसपाट झाली. पुढे मित्रपक्ष म्हणून भाजप स्वाभिमानीला मंत्रीपद देईल या अपेक्षेत संघटनेचे र्तुेबाज नेते सदाभाऊ खोत होते. मात्र मंत्रिमंडळात विस्तार करताना शपथविधीसाठी उपस्थितीचे निमंत्रणही त्यांना दिले नाही. त्यामुळे सध्यातरी स्वाभिमानीची विधान परिषदेची अपेक्षा दृष्टीआड झाल्याचे चित्र आहे. स्वाभिमानीच्या तिकिटावर लढलो नसतो तर आपला विजय नक्की होता, अशी पराभूत उमेदवारांकडून री सध्या ओढली जात आहे. ज्यांच्या विरोध आंदोलन केली त्यांनाच तिकिट दिले. यामुळे स्वाभिमानीला जिल्हय़ात बळीराजाच्या रुपाने सध्या पर्याय उभा राहिला आहे. सरळ सुद 'माऊली' ही आज स्वाभिमानीत नाही. वरुनवरुन 'जयंत' आपला वाटत आहे. 'विष्णु'पंत सत्तेच्या कोष्टकात अडकले आहेत. 'दीपक' करकरीत चारचाकीच्या दिमतीत आहे. यामुळे कारखान्याची धुराडी पेटली तरी स्वाभिमानीच्या आंदोलनात तेज प्रखरता जागवत नाही. ज्यासाठी केला होता 'अट्टाहास' तो नेमका अट्टाहास संघटना विसरल्याने सदा सत्तेवर डोळा ठेवल्याने आता नुसती संघटना उरली आहे. त्यात 'स्वाभिमान' उरला नसल्याचे 'बळीराजा' खुलेआम बोलत आहे. - 


















शरीफ सय्यद 

Post a Comment

 
Top