वाचवा...!वाचवा...!!सोलापूर शहरातील गुंडागर्दी, भरदिवसा खून, दरोडे, दगडफेक होऊन कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ लागल्याने शासनाने सोलापूर शहरासाठी आयुक्तालय मंजूर केले. जेणेकरुन शहरातील कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवता येईल, याचा विचार करुनच पोलीस आयुक्तालयाला मंजुरी दिली. पोलीस आयुक्तालय अस्तित्वात आल्यानंतर त्याकाळी असलेल्या नावाजलेल्या गुंडांना वठणीवर पोलिसांनी आणले होते. त्यामुळे सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिली होती. मात्र आता उलट स्थिती दिसू लागली आहे. पोलीस आयुक्तालय असून पोलिसांचा मोठा फौजफाटा असूनही पोलीस आयुक्त प्रदीप रासकर यांना कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवता येत नसल्याचे दिसून येऊ लागले आहे. महिनाभरात दगडफेक, जबरी चोरी, मारामारी आदी प्रकार वरचेवर वाढूच लागल्या आहेत. यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा बोर्या वाजल्याचे दिसून येत आहे. ज्या कामासाठी पोलीस आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली, ते कामच आता पोलिसांकडून होत नसल्याचे दिसून येऊ लागले आहे. ज्या कामासाठी पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे ते काम सोडून इतर उद्योगच काही पोलीस करत असल्याचे सांगण्यात येते. काही पोलीस समाजात तेढ निर्माण करणार्या लोकांबरोबरच जवळीक साधून असल्यानेच वारंवार कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडण्यास जबाबदार असणारे व कायदा हातात घेणार्यावर ठोस कारवाई होत नसल्यानेच समाजविघातक कृत्य करणारे गुंड डोके वर काढत आहेत. समाजविघातक कृत्य करुन खुलेआम हे लोक फिरत आहेत. त्यामुळेच कुठल्याही किरकोळ घटनेवरुन दगडफेकीसारखे प्रकार सोलापुरात घडत आहेत. पोलिसांचा धाकच गुन्हेगार व समाजविघातक कृत्य करणार्यावर नसल्याने ते कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे काम करत आहेत. यांना वेळीच आवर घातल्यास कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही. कायदा व सुव्यवस्था बिघडविणार्यामध्ये अवैध धंदे करणार्यांचा मोठा सहभाग आहे. हे धंदेचालकच कायदा व सुव्यवस्था बिघडवत असल्याचे दिसून येत आहे. अवैध धंदे चालकावर पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याचे दिसून येते. सोलापूर शहरात मोठय़ा प्रमाणात मटका, हातभट्टी दारु, वेश्या व्यवसाय, गुटखा, अवैध प्रवासी वाहतूक यावर पोलिसांचे नियंत्रणच राहिले नाही. या अवैध धंदे चालकांकडून काही प्रमाणात पैसे गोळा होत असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नसल्याची ओरड आहे. याला सोलापूर शहरातील पोलीसच जबाबदार आहेत. सोलापूर शहरात पोलीस आयुक्त हिम्मतराव देशभ्रतार, भूषणकुमार उपाध्याय या पोलीस आयुक्तांच्या कार्यकाळात दगड मारणे सोडा दोन गटात हाणामारी करण्यासही नागरिक धजावत नव्हते. दोन गटात हाणामारी केल्यास मोठी कलमे लावून त्यांना एक-दोन महिना जामीन मिळविता येऊ नये, अशी कलमे लावल्याने शहरात हाणामारीच्या घटनेमध्ये घट झाली होती. यामुळे या दोन्ही आयुक्तांची सोलापूर शहरात दहशत निर्माण झाली होती. पोलीस आयुक्त प्रदीप रासकर यांच्या कार्यकाळात किरकोळ कारवाया करण्यात आल्या. मात्र जे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यासाठी जे व्यवसाय, लोक जबादार आहेत अशांवर ठोस कारवाई झाली नसल्यानेच नागरिकांत पोलिसांची भीतीच राहिली नाही. भीती म्हणजेच मारहाण नव्हे तर कायद्याचा धाक ठेवण्यास पोलीस आयुक्त रासकर हे कमी पडले असल्याचे दिसून येते. कायद्याचा बडगा उगारल्यास हाणामारी तर सोडा साधी बसवर दगड मारण्याची हिम्मत कोणी करणार नाही. यासाठी पोलीस आयुक्तांनी ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. अन्यथा दगड पडत राहणार, हाणामार्या सुरु राहून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न वारंवार घडत राहणार. त्यासाठी पोलीस आयुक्तांनी कायद्याचा धाक ठेवण्याची गरज आहे.
सरदार अत्तार
Post a Comment