मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
मुंबई :
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे सरसावले आहेत.पाण्याचे दुर्भिक्ष दूर करण्यासाठी दीर्घ मुदतीच्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. जलसंधारणाच्या विविध योजनांना एकत्रित करून जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत एकत्रितरीत्या राबविण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नियंत्रण समिती स्थापन करण्यात येऊन सर्व निधीदेखील एकत्रित करण्यात येणार आहे. येत्या वर्षभरात राज्यातील ५ हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला असून २0१९ पर्यंत महाराष्ट्र टंचाईमुक्त करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री विद्या ठाकूरदेखील यावेळी उपस्थित होत्या. 'सह्याद्री' अतिथीगृह येथे आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.
टंचाईमुक्त महाराष्ट्र २0१९ या विषयावर शुक्रवारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे,पोपटराव पवार तसेच अधिकारी यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्रातील अनेक भाग हे दुष्काळप्रवण आहेत. या भागातील दुष्काळ निर्मूलनासाठी शासन विविध उपाययोजना करत आहे. त्यासाठी जलसंधारणासंदर्भातील सर्व विभागांचे तसेच त्यांच्या निधीचेही एकत्रीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या सर्वांचे नियंत्रण थेट मुख्यमंत्री कार्यालयातून करण्यात येणार आहे. विविध तलावांतील गाळ काढण्यास तातडीने सुरुवात करण्यात येणार आहे. जिल्हाधिकार्यांना उपाययोजना राबविण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्याचा आराखडा तयार करण्यात येईल. कुठल्या जिल्ह्यात कुठले प्रयोग यशस्वी ठरतात हे पाहण्यात येईल.उपाययोजनांची अंमलबजावणी लगेचच सुरू करण्यात येईल, जेणोकरून येत्या पावसाळ्यात त्या प्रत्यक्षात आलेल्या दिसतील.प्रत्येक योजना सुरू करण्याआधी आणि पूर्ण झाल्यानंतर तिचा अक्षांश, रेखांशासह डिजिटल फोटो काढण्यात येईल जेणोकरून ती किती पूर्ण झाली हे समजून येईल, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Post a Comment