0

महान भगवतभक्त महावैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराज कालीन १२ व्या शतकात मंगळवेढे नगरीत त्यावेळी बिदरचे बहामनी राज्याचा जुल्मी सत्तेचा अंमल होता. अशा जुलमी सत्तेच्या काळात मंगळवेढ्यात कृष्ण तलावाच्या शेजारीस एक जुनाट असे महादेवाचे मंदीर आहे. आणि त्या मंदीराशेजारी शामा नायकीण नावाची एक नर्तकी नाचगाणे करून त्यावेळच्या धनधांडग्या अमिर उमरावांना व मुसलमानी सरदारांना खुश करीत असे. प्रसंगी स्वत:चा देह विक्री करायला सुध्दा ती मागे पूढे पाहत नसे. त्यामूळे तिची किर्ति दुरवर पसरली होती. लांब लांब चे श्रीमंत व धनवान लोक मंगळवेढ्यास येऊन शामा नायकीणच्या घरी हजेरी लावत असत. अशा या शामा नायकीणच्या पोटी सुंदर असे एक कन्यारत्न जन्मास आले. चिखलातून तसे कमळ उगवावे त्याप्रमाणे ती कन्या चंद्रकलेसारखी दिवसेंदिवस वाढू लागली. शामाने तिचे नाव कान्होपात्रा असे ठेवले. कान्होपात्रा रूपवती होती. तितकीच बुद्धीमानही होती. ती मेनका-अप्सरेचा अवतार असल्याचं लोककथांमधून मांडलं गेलंय. गायन आणि नृत्यात तिने अगदी लहान वयात प्रावीण्य मिळवलं होतं. हळूहळू तिचं कलानैपुण्य आणि सौंदर्याची कीतीर् दूरवर पसरली. तिची आई अत्यंत धनवान गणिका होती. महालासारखा त्यांचा भव्य प्रासाद होता. अनेक दासी तिच्या सेवेला तत्पर होत्या. शामाने कान्होपात्रेच्या शिक्षणाची चोख व्यवस्था केली होती. कान्होपात्रेने आपला गणिका व्यवसाय पुढे चालू ठेवावा. राजदरबारी रूजू व्हावं असं शामाला वाटत होतं. तर कान्होपात्रेला त्याची किळस वाटत होती. मुलीच्या रूपगुणांना योग्य असा पुरूष कान्होपात्रेला मिळावा असं शामाला वाटत होतं. पण कान्होपात्रेने आईला स्पष्ट सांगितलं की माझ्यापेक्षा रूपवान पुरूष असेल तर मी त्याच्याजवळ राहेन, विवाह करेन. ही अट अर्थात कठीण होती. व ती पंढरपूरास वारक-यासोबत वारीला जात असे. त्यामुळे तिला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीची भेट होऊन सहवास लाभला. संत संगतीमुळे तिच्या जीवनात अमुलाग्र बदल झाला व ती नेहमी हरीनाम दंग होत असे व किर्तन ही करत असे. तीचे अनेक अभंगही प्रसिध्द आहेत. योगिया माजी मुगुट मणी । त्रिंबक पाहावा नयनी ॥ माझी पुरवावी वासना । तू तो उध्दाराच राणा ॥ करुनिया गंगा स्नान । घ्यावे ब्रह्मगिरीचे दर्शन ॥ कान्होपात्रा म्हणे पंढरीराव । विठठल चरणी मागे ठाव ॥ तिच्या देखणेपणाची ख्याती बिदरचे बादशहाला समजताच त्याने तिला पकडून आणण्यासाठी आपल्या सरदारास मंगळवेढ्यास पाठवले. आपले शील भ्रष्ट होऊ नये म्हणून ती पंढरपूरी गेली व विठठल मंदीरात जाऊन परमेश्वराचा धावा करु लागली. बादशहाचे सरदार तिला पकडण्यासाठी मंदिरात गेले. त्यावेळी कान्होपात्रेने भक्तवत्सल पांडूरंगाच्या पायास कडकडून मिटी मारली व आर्तवाणीने पांडुरंगाचा धावा केला नको देव राया अंत असा पाहू । प्राण हा सर्वता जावू पाहे ॥ हरीणीचे पाडस । व्याघ्रे धरीयले । मजलागी झाले तैसे देवा ॥ मोकलून आस । जाहले उदास । घेई कान्होपात्रेस ह्र्द्यात ॥ बादशहाच्या सरदाराने तिचा पंढरपूरी पाठलाग केला. तेंव्हा तिने अत्यंत करूण वाणीने धावा करून आपला देह पांडुरंगाच्या चरणी समर्पण केला. परमेश्वर प्रसन्न झाले. तिचा जीवआत्मा तिचे कुडीतून परमेश्वर स्वरूप झाला व तिचा देह तेथेच मृतवत होऊन पडला. तिला मंदिराच्या दक्षिण दरवाज्याजवळ पूरण्यात आले आहे. तेथे एक तरटी वृक्ष उगवला असून तो अक्षय हिरवा आहे. शालिवाहन १२ व्या शतकात घडलेली ही सत्य घटना कान्होपात्रेच्या तरटी वृक्षाच्या रुपाने आजही जसाच्या तशी पांडुरंगाच्या मंदिरात काळ्या दगडावर उभी आहे.

Post a Comment

 
Top