0

नागपूर : आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात सोलापुरातल्या हजारो महिला रस्त्यावर उतरल्याचं पाहायलं मिळालं. प्रणिती शिंदे आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली. माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा काढण्यात आला. मागील आठवड्यात प्रणिती शिंदे यांनी नरसय्या आडम यांच्यावर फसवणुकीचे आरोप करत त्यांच्याविरोधात मोर्चा काढला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून आज हजारोंचा हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. माकप नेते नरसय्या आडम यांनी कामगारांसाठी 45 हजार घरांचा प्रकल्प हाती घेतला आहे. केंद्र शासनाच्या राजीव आवास योजनेतून गरिबांना हक्काची घरं मिळणार आहेत. मात्र अशी कुठलीच योजना नसून आडम हे कामगारांची फसवणूक करत असल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आडम यांच्या नेतृत्वाखाली आज विराट मोर्चा काढण्यात आला. राज्य शासनाच्या मंजुरीनंतर या योजनेला गती मिळणार होती. पण प्रणिती आणि सुशीलकुमार शिंदे यांनी राज्य सरकारवर दबाव आणून या योजनेत आडकाठी आणल्याचा आरोप आडम यांनी यावेळी केला. प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या कृतीमुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आंदोलकांनी केली.

Post a Comment

 
Top