0

नागपूर : राज्यातील ३२ तालुक्यांतील ८00 गावांना गारपीट आणि अवकाळी पावसाचा तडाखा बसला असून त्यात २५ हजार ५00 हेक्टर फळपीक जमिनीचे १00 टक्के नुकसान झाले आहे. या तडाख्याचा आवाका लक्षात घेऊन राज्य सरकारने कोरडवाहू शेतीसाठी हेक्टरी १0 हजार, तर बागायती शेतीसाठी हेक्टरी १५ हजार रुपयांची मदत मंगळवारी जाहीर केली. बहुवार्षिक फळबागा तसेच वाहून गेलेल्या जमिनींसाठी हेक्टरी २५ हजार रुपये मदतही देण्यात येणार आहे. राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी गारपीट आणि अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. नाशिक, जळगावसह कोकण, पश्‍चिम महाराष्ट्राला वादळी पाऊस आणि गारांनी झोडपून काढले. त्यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले. परिणामी आंबा, काजू, कांदा, गहू, हरभरा, मका, कपाशी, टोमॅटोसह भाजीपाला आणि द्राक्षे, केळी आणि डाळींब या सर्व फळबागांचे नुकसान झाले आहे. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी नियम १0१ अन्वये विधानसभेत अल्पकालीन चर्चा उपस्थित केली. त्याला उत्तर देताना गारपीट आणि अवकाळी पावसाने त्रस्त शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी कृषी तसेच मदत व पुनर्वसनमंत्री एकनाथ खडसे यांनी आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर केले. अवकाळी पावसामुळे खरवडल्या गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी २0 हजार रुपये, गारपीट व अवकाळी पावसामुळे मृत व्यक्तीच्या वारसाला अडीच लाख रुपये, मृत मोठय़ा जनावरामागे २५ हजार रुपये, मध्यम जनावरामागे १0 हजार तर लहान जनावरामागे पाच हजार रुपये, पक्क्या घराचे नुकसान झाल्यास ७0 हजार रुपये, कच्च्या घरासाठी २५ हजार रुपये तर अंशत: उद्ध्वस्त घरासाठी १५ हजार रुपये देण्यात येतील, असेही खडसे यांनी सांगितले. द्राक्ष, आंबा, डाळींब इत्यादी फळबागांच्या नुकसानभरपाईसाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडून अर्थसहाय्य मागितले असता राष्ट्रीय फलोत्पादन विभागाकडून देण्यात येत असलेल्या विशेष योजनेअंतर्गत या फळबागांच्या शेतकर्‍यांना हेक्टरी ७0 ते ८0 हजार रुपये मदत मिळू शकणार आहे.

Post a Comment

 
Top