मंगळवेढा / प्रतिनिधी
शहरातील तुकाईनगर येथे शुक्रवार दि. २३ रोजी पहाटे मोटारसायकलवरून येऊन सात चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला. परंतू, या चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे शहरात चोर जोमात तर पोलीस कोमात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मंगळवेढा पोलीस ठाण्याला गल्लीबोळातून गस्त घालण्यासाठी पोलीस अधिक्षक दत्तात्रय मंडलिक यांनी दोन अत्याधुनिक मोटरसायकली दिल्या आहेत. मात्र, या गाड्या अद्यापही गल्लीबोळात फिरकल्याच नाहीत. पोलीस खाते चोरट्यांचा तपास सुरू आहे, एवढेच सांगून वेळ मारून नेत आहे. या परिसरातील कुटुंबामध्ये चोरट्यांची दहशत असून कुटूंबे अक्षरश: जागून रात्र काढत आहेत. दि. २१ रोजी कारखाना रोडवरील एका महिलेला दिवसाढवळ्या चाकू दाखवून गळ्यातील मंगळसूत्र पळविण्याचा प्रय▪झाला. मात्र, त्या महिलेने आरडाओरड करताच त्याने मोटारसायकलवरून पळ काढला. तसेच शहरातील तहसिल कार्यालय भागात लॅपटॉप, कॉम्प्युटरचीही चोरी झाली होती. त्याचाही अद्याप तपास लागला नाही. मंगळवेढा शहरात २७ डिसेंबर २0१४ रोजी संगीता माळबागी यांच्या गळ्याला चाकू लावून दोन लाखाचा ऐवज लुटल्याप्रकरणातील चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अद्यापही यश आले नाही. त्यामुळे शहरात एका पाठोपाठ एक चोरीच्या प्रमाणात वाढ होत आहे. शुक्रवारी पहाटे हे पथक गस्त घालीत असताना तीन मोटारसायकलवर सात चोरटे तुकाईनगर परिसरात आले होते. या दरम्यान, पथकाची व चोरट्यांची नजरानजर झाल्यानंतर दोन मोटारसायकलवरील चोरटे नागणेवाडी भागात पळाले तर एक मोटारसायकलवरील दोघे चोरटे जगताप यांच्या प्लॉटिंगमध्ये घुसल्याचे गस्ती पथक प्रमुखाने सांगितले. चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. पोलिसांची गस्तही चालू आहे. पोलीस व्हॅन मुख्य रस्त्यावरून गस्त घालत आहेत. चोरटे हे गल्ली बोळातून वाहन येणार नाही अशा ठिकाणी ते धुडगुस घालीत आहेत. तरी या प्रकरणी पोलीस अधिक्षक दत्तात्रय मंडलिक यांनी लक्ष घालून येथील नागरिकांना भयमुक्त करावे, अशी मागणी तुकाईनगर भागातील नागरिकातून होत आहे. दरम्यान, चोरीच्या घटनेनंतर नागरिकांनी ३६ लोकांचे गस्ती पथक तयार केले आहे. सोमवार ते रविवार रात्री १२ ते पहाटे ४ वाजेपर्यंत प्रत्येकी पाच लोकांची सात पथके कार्यरत आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment