बसवेश्वर बेडगे-
मानवी विकासासाठी भविष्यात बालकांनी करिअरचा पर्याय म्हणून विज्ञान क्षेत्राचा विचार करावा असे आवाहन माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी केले आहे. मुंबईतील 102 व्या आयोजित भारतीय विज्ञान परिषदे दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या बाल विज्ञान परिषदेचे उदघाटन कलाम यांच्या हस्ते आज झाले त्यावेळी ते बोलत होते.
विज्ञानाशी संबंधित विविध क्षेत्रातील भविष्यातील शास्त्रज्ञ या रुपात मी या बालकांकडे पाहतो असे ते म्हणाले. तंत्रज्ञान हा भविष्य निर्मितीचा कणा असल्याचे नमूद करत वैद्यकीय क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाच्या वापरासंदर्भातील विविध उदाहरणाचा दाखला कलाम यांनी यावेळी दिला. मंगळयानाच्या यशस्वी मोहिमेबद्दलही त्यांनी यावेळी कौतुक केले. मानवतेशी संबंधित विविध समस्यांच्या निराकरणासाठी बालकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी राष्ट्रीय बालविज्ञान परिषद यासारखे कार्यक्रम महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरत असल्याचे ते म्हणाले.
विज्ञान क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी यावेळी नऊ बालकांना इन्फोसिस पुरस्काराने कलाम यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
तत्त्पूर्वी वांद्रे कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानात आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाचेही कलाम यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. बालकांनी तयार केलेली विविध साधने या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत.
-------------------------------------------
-------------------------------------------
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment