0

निसर्गाचा जसा नेम नसतो त्याप्रमाणे खा. शरद पवार यांच्या राजकीय खेळीचा नेमका अंदाज नसतो हे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामती भेटीने पुन्हा सिध्द झाले आहे. सत्ता काळात सर्वांच्याच भोवती सारखा राबता असतो, सत्ता गेली की सतत सोबत असणारे ही नेतृत्व, पक्षापासून अंतर ठेवतात हे वास्तव आहे. या निसर्ग नियमावरही खा. शरद पवार यांनी मात करत थेट देशाच्या कर्त्या नेतृत्वासोबत हातमिळवणी करुन त्यांनी सत्तेशिवाय असणार्‍या काळात राष्ट्रवादीचा एकही चिरा निखळणार नाही याचा पक्का बंदोबस्त केला असल्याचे सांगण्यात येते. आमचा माणूस तुम्ही घ्यायचा नाही, त्या बदल्यात महाराष्ट्र राज्याच्या सत्तेत सहभागी शिवसेनेच्या खच्चीकरणात आम्ही सर्वतोपरी प्रय▪करु, असा अलिखित करारनामा खा. पवार व भाजपच्या केंद्रीय नेतृत्वात झाल्याचे बोलले जाते. हाताच्या कांकणाला आरसा कशाला हे सिध्द करण्यासाठी दस्तूरखुद्द पंतप्रधानांना बारामतीत बोलावून खा. पवार यांनी कॉंग्रेसच्या हाताला कापरे सोडले आहे. ही खेळी करत असताना नेमका शिवसेना नेतृत्वाच्या नथीतून बाण मारण्यात ते यश्स्वी झाले. त्या बरोबरच त्यांनी बंडोबा करुन चौफेर उधळू इच्छिणार्‍या राष्ट्रवादीच्या पांढर्‍या अश्‍वांना काटेवाडी लगाम घातला आहे. एका दगडात दोन पक्षी मारता येतात ही लोक म्हण खोटी ठरवत एका दगडात तीन-तीन पक्षी (... नव्हे पक्ष) जायबंदी करता येतात हेही त्यांनी यानिमित्ताने सिध्द केले आहे. पवारांच्या या पॉवरबाज खेळीने अनेक राजकीय चाणक्य बुचकळ्यात पडले आहेत. राजकारणात वय नव्हे तर अनुभव महत्त्वाचे असतात हे त्यांनी न बोलता 'अजित' अशा कृतीतून राष्ट्रवादीच्या दुसर्‍या फळीतील वायफळ नेत्यांनाच एकप्रकारे शिकवण दिली आहे. खा. शरद पवार यांच्या या राजकीय कृतीचा दणका सोलापूर जिल्हय़ासह राज्यातील इतर चुळबूळ करणार्‍या नेत्यांना बसला आहे. सत्तेत असो वा नसो राजकारणात चलती मात्र आपलीच ही शरदनीती या प्रकाराने खा. पवार यांनी पुन्हा सिध्द केली आहे. या पवारांच्या खेळीने राष्ट्रवादीचा तात्कालीन मित्रपक्ष असणार्‍या कॉंग्रेसला ही मोठी चपराक बसली आहे. वर्षानुवर्षे सत्तेला चटावलेली नेते मंडळी सत्तेबाहेर राहू शकत नाहीत. याचा दांडगा अनुभव खा. पवारांना आहे. विरोधी बाकावर असतानाही आपल्या चिरेबंद पक्षाचा कुठलाही बुरुज ढासळू नये, याची खबरदारी ते घेत आहेत. यातून पंतप्रधानांना बारामतीत येण्याचे अवताण धाडून राष्ट्रवादीच्या संभाव्य फुटीचा धोका टाळणे हे त्यांचे प्रमुख धोरण असल्याचे बोलले जात आहे.                          

                                              - शरीफ सय्यद

Post a Comment

 
Top