गादेगाव येथील धनाजी देशमुख यांचा विक्रम
रासायनिक खतांच्या वारेमाप वापरामुळे होत असलेले शेतीचे नुकसान आणि उत्पादित माल निर्यात करण्यासाठी येत असलेला अडसर लक्षात घेऊन पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील प्रयोगशील शेतकरी धनाजी माणिकराव देशमुख यांनी पाण्यातील क्षार वेगळे करण्यासाठी चुंबकीय तंत्रज्ञानाचा अवलंब करुन सेंद्रीय खतांच्या जोरावर २0 एकर जमिनीतून डाळिंबाचे १ कोटी १२ लाख रुपयांचे उत्पादन घेऊन विक्रम केला आहे. सध्या शेतात सर्रास प्रत्येक शेतकरी रासायनिक खतांचा वापर मोठय़ा प्रमाणात करीत आहेत. रासायनिक खतांच्या अतिरेकी वापरामुळे पिकांच्या मुळांमध्ये समस्या निर्माण होतात. मोठय़ा प्रमाणात दिलेली खते जमिनीत स्थिर होतात. रासायनिक प्रक्रियेमध्ये विविध संयुगे तयार होतात. त्याचा पाण्यातील घटकांशी संपर्क येतो. आणि फळबागा कोमेजण्याचे प्रकार घडतात. त्यातूनच विविध रोग एकाचवेळी हल्ला करतात. झाडांना दिलेले पाणी सात एच.पी.पॉवरच्या पंपाने दिले तरच मुळे ते पाणी शोषतात. अन्यथा पाण्याचे शोषण पिकाला करता येत नाही, हा जाणकारांनी दिलेला सल्ला आणि प्रत्यक्षात वाट्याला आलेला अनुभव लक्षात घेऊन देशमुख यांनी पाण्यातील क्षार वेगळे करणार्या चुंबकीय तंत्रज्ञानाचा वापर डाळिंब शेतीसाठी केला आहे. या तंत्रज्ञानासाठी एक लाख रुपये खर्च आला असल्याचे देशमुख यांनी बोलताना सांगितले. या तंत्रज्ञानामुळे पिकाला पाणी देत असताना विद्युत पंपातून पाणी फेकल्यानंतर त्यातील क्षारांचे विघटन होते आणि फिल्टर केलेले पाणी पिकाला मिळते. ते पिकाला चांगले मानवत असल्याचेही देशमुख म्हणाले. चुंबकीय तंत्रज्ञान, सेंद्रीय खतांचा पुरेपूर वापर, जोडीला शेणखत आणि जीवाणू कल्चरचा वापर करुन त्यांनी २0 एकर जमिनीतून १ कोटी १२ लाख रुपयांचे डाळिंबाचे उत्पादन घेतले आहे.
डाळिंबामध्ये सध्या सगळीकडे तेल्या, मर, फळकूज, फांदी मर आदी रोगांचे थैमान आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी त्रस्त झाले आहेत. अशातच हवामानात होणार्या अचानक बदलाला सामोरे जाऊन डाळिंब उत्पादन घेणे सहजासहजी शक्य होत नाही. तेव्हा देशमुख यांनी त्यांचे बंधू जयसिंह देशमुख यांचे मार्गदर्शन घेतले. विहिरीतील पाणी प्रयोगशाळेतून तपासून घेतले. त्यात मोठय़ा प्रमाणात क्षार असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी इलेक्ट्रो मॅग्नेटिक सिस्टीम बसवून घेतली. फिल्टर झालेले पाणी डाळिंबाच्या बागेला मिळू लागल्यामुळे जिथे एका डाळिंबाचे वजन ३५0 ग्रॅम भरायचे ते फळ ५00 ग्रॅम इतके वजनाला भरले असल्याचेही देशमुख म्हणाले. देशमुख यांनी साडेपाच हजार डाळिंबाच्या झाडांपासून १ कोटी १२ लाखांचे उत्पन्न घेतले आहे. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिफारसीप्रमाणे त्यांनी १४ फूट बाय १0 फूट अंतरावर डाळिंबाची लागवड केली आहे. दरवर्षी एकच बहार धरण्यावर त्यांचा भर असतो. भरघोस उत्पादनाचे तंत्र सांगताना देशमुख म्हणाले की, पाण्याच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक झाडाला पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर असे चार ड्रीपर असून झाडाला मोजून पाणी दिले जाते. प्रति झाड २0 किलो याप्रमाणे त्यांनी शेणखत व सेंद्रीय खत दिले. जीवाणू कल्चरचा वापर करीत असताना त्यांनी निंबोळी पेंडीत नायट्रोजन विरघळणारे व स्थिर करणारे अँझोटोबॅक्टर, स्फूरद विरघळविणारे जीवाणू त्यात पी.एस.बी. व पोटॅश विरघळणारे जीवाणू, द्रवरुपातील सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचा वापर केला जातो. झाडांना भरपूर सूर्यप्रकाश, मोकळी हवा, पाण्यातील क्षारांचे विघटन करण्यासाठी इलेक्ट्रो चुंबकीय यंत्रणा कार्यान्वीत, पाण्याचे प्रमाण कमी, जीवाणू कल्चर घरच्या घरी बनवून त्याचा प्रत्येक झाडाला वापर, खत मात्रा देताना शेवटच्या हप्त्यात विद्राव्य खतांचा वापर या सूत्रांचा वापर केल्यामुळेच तेल्याविरहित निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन घेणे शक्य झाले असल्याचे देशमुख यांनी बोलताना सांगितले.
धनाजी देशमुख, मोबाईल-
९९७0३३९000
Post a Comment