0

नंदूर (ता. मंगळवेढा) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आ. भारत भालके गटाच्या शारदा गुराय्या स्वामी यांची निवड करण्यात आली. सरपंच यशोदा आठवले यांच्यावर अविश्‍वास आल्याने या रिक्त पदावर दि. २ मार्च रोजी झालेल्या सरपंच पदाच्या निवडीत आ. भारत भालके गटाच्या शारदा गुराय्या स्वामी व सविता धर्मण्णा चौगुले यांचे अर्ज दाखल करण्यात आले होते. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या नऊ आहे. त्यापैकी पाच मते शारदा स्वामी यांना पडल्याने निवडणूक निर्णय अधिकारी संदीप कोळेकर यांनी त्यांची सरपंचपदी निवड झाल्याचे जाहीर केले. तलाठी चंद्रकांत इंगोले, ग्रामसेवक ज्ञानेश्‍वर डोके यांनी काम पाहिले. गेल्या दोन वर्षापूर्वी झालेल्या नंदूर ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी चुरश निर्माण झाली असता सरपंच यशोदा आठवले यांच्या निवडीप्रसंगी शारदा स्वामी यांनी आठवले यांना पाठिंबा दिला होता. त्याची परतफेड आम्ही आता करीत आहोत, असे मत माजी सरपंच यशोदा आठवले यांनी 'पुण्य नगरी'शी बोलताना व्यक्त केले. नूतन सरपंच शारदा स्वामी म्हणाल्या, आमच्यावर ग्रामस्थांनी व सदस्यांनी विश्‍वास दाखवून सरपंच पदाची संधी दिली. भविष्यात आ. भालके यांच्या माध्यमातून गावाला विकासाच्या पथावर नेऊ. निवडीनंतर संपूर्ण गावात गुलाल उधळून व फटाक्यांची आतषबाजी करून आनंद साजरा करण्यात आला.

Post a Comment

 
Top