सगळीकडून एकच गलका झाला. विशीचा एक तरूण शेतकरी काहीतरी बोलण्याचा, विचारण्याचा प्रयत्न करत असताना बाकीच्या शेतकऱ्यांनी त्याला गप्प बसवलं. वातावरण शांत झालं आणि मग मंत्रिमहोदयांनी परत बोलायला सुरूवात केली. गर्दीतला तो तरूण शेतकरी नंतर गप्प होऊन गर्दीचा भाग होऊन गेला.
मंत्रिमहोदयांचा दौरा पुढे सुरू राहिला. केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी नाशिकचा दौरा केला. ते राज्याच्या दौऱ्यावर येणार आहे कळताच मी त्यांना फोन केला, मी पण येतो सांगून सकाळीच नाशिक गाठलं. विमानतळापासून भाजपच्या कार्यकर्त्यांच्या जवळपास 20 गाड्या ताफ्यात होत्या. भला मोठा कॉन्वॉय निफाड परिसरातल्या गावांमधून धुरळा उडवत पुढे सरकत होता. आजूबाजूला द्राक्षांच्या बागा दिसत होत्या. बरंच नुकसान झालंय. रस्त्याच्या काठाला शेतकरी उभे होते सर्व बघत. आपल्या शेतात पण त्यांनी यावं म्हणून काहीजण निवेदनं घेऊन उभे होते. तर हे येऊन काय करणार असे ही भाव काहींच्या चेहऱ्यांवर दिसत होते. द्राक्ष आणि कांद्याचं मोठं नुकसान या भागात झालं.
तसं संपूर्ण महाराष्ट्रातच दुष्काळ, अवकाळी आणि गारपीटीच्या विचित्र माराने मोठं नुकसान झालंय. कोकणाला मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी झटणाऱ्या संजय यादवराव ने ग्लोबल कोकणच्या माध्यमातून बरंच काम केलंय, ते परवा भेटले होते. तुम्ही सर्व लोक कोकणाकडे दुर्लक्ष करता पण कोकणातही बरंच नुकसान झालंय. कोकणी माणूस रडत नाही म्हणून तुम्ही त्याच्याकडे बघत नाही अशी तक्रार ते करत होते. अशीच काहीशी तक्रार मराठवाड्यातले लोक पण करतायत. विदर्भातल्या शेतकऱ्यांची तर ही नेहमीची व्यथा. शेतीत काही राहीलं नाही, पण दुसरं काय करणार असा प्रश्न जिथे तिथे शेतकरी विचारतात. त्यांच्या या प्रश्नाला काय उत्तर द्यायचं हा ही एक प्रश्नच. मी नाशिकला गेलोय कळल्यावर काही शेतकऱ्यांचे फोन आले, साहेबांना हे विचारा, साहेबांना ते विचारा म्हणून....
साहेब शेतात जाऊन आले. काही शेतकऱ्यांशी बोलले. नंतर एका गावात राधामोहन सिंह, एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांसमोर भाषण करून त्यांना मार्गदर्शन ही केलं. आम्ही पण शेतकरी आहोत आणि त्यामुळे तुमची दु:खं आम्हाला कळतात. हेक्टरी दिली जाणारी मदत कमी आहे. नुकसान काही लाखांचं आणि मदत हजारांमध्ये हे गणित ही बरोबर नाही असं खडसे म्हणाले. 25 हजारांची हेक्टरी मदत द्यायची घोषणाही त्यांनी केली. शेतकऱ्यांसाठी एक विशेष पॅकेज पण जाहीर करू असं आश्वासन त्यांनी दिलं. राधामोहन यांनी पण पंतप्रधान नरेंद्र मोदींचं गुणगान गायलं आणि शेतकऱ्यांसाठी किसान आमदनी बिमा योजना लागू करू असं जाहीर केलं. गर्दीतल्या काहींनी टाळ्या वाजवल्या काहींनी गप्प बसणं पसंत केलं. तिथे एक शेतकरी आला होता मलमलचं मोदी जॅकेट घालून. तो ही किती नुकसान झालं याचा पाढा वाचत होता. प्रचंड नुकसान झालंय असं तो सांगत असताना साहेब मात्र राज्य सरकाने पंचनामे वेळेवर पूर्ण केले ही अभिमानाची गोष्ट असल्याचं सांगत होते. तर दुसरीकडे साहेबांसोबत आलेले कार्यकर्ते आणि पोलीस आसपासच्या शेतांतल्या द्राक्षाच्या बागांमधून द्राक्षांचे घड तोडून गाड्यांमध्ये ठेवत होते. टिपीकल सरकारी दौरा.
ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी दिला ती गावं भाजपच्या कार्यकर्त्यांची- किंवा भाजपच्या प्रभावाखालची. असो, त्याने पार काही फरक पडत नाही. जे नुकसान ते नुकसानच... सगळ्यांचं सारखंच.. या आधी कदाचित काँग्रेस – एनसीपीवाले त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गावांत फिरले असतील. मौका सबको मिलता है..। तो निदान नैसर्गिक आपत्तीच्या निमित्ताने मिळू नये, फार तर आपण एवढीच अपेक्षा ठेऊ शकतो. आघाडीसरकारच्या काळात जे झालं ते यंदा होऊ नये याच अपेक्षेमुळे सत्तांतर झालंय एवढं सरकारमध्ये असलेल्यांच्या लक्षात असेलच त्यामुळे हा विषय आपण त्यांच्या सद्सदविवेक बुद्धीवर सोडू.
मागच्या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे त्या योजना बदलाव्या लागतील असं राधामोहन यांनी मला नंतर सांगीतलं. यांचेच नेते काही दिवसांपूर्वी बारामतीला मार्गदर्शन घ्यायला गेले होते का असा प्रश्न ही मला थोड्या क्षणासाठी पडला पण मी लगेच भानावर आलो. नाशिकचा दौरा आटोपला. मंत्र्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये काही शेतकरी त्यांच्यावर चप्पल फेकून मारणार होते. नाशिकदा अनेक वेळा पवारांच्या सभेत लोकांनी कांदे फेकल्याच्या बातम्या पाहिल्यायत मी. त्यामुळे नाशिक आपल्या इतिहासाला जागणार असं वाटत होतं, पण अचानक मंत्र्यांनी दौऱ्याचा क्रम बदलला आणि ते विमानतळावरच मिडीयाशी बोलून मुंबईकडे निघाले. मंत्र्यांचा दौरा आटोपल्यानंतर मी काही शेतकऱ्यांशी बोललो. ते मोठ्या आशेने विमानतळावर आले होते, पण त्यांना साहेबांपर्यंत पोहोचता आलं नव्हतं. सरकारी मदत-पंचनामे आणि मागण्या आणि स्थानिक नेत्यांकडे खेटे यातच त्यांचा दिवस जातोय. पुन्हा सत्तांतरानंतर पुढारी बदलल्यामुळे त्यांची स्थिती तर आणखीच बिकट झालीय.
आपत्ती कसलीही असली तरी ती कुठल्या भागात होते, कुणाच्या“एरियात” होते हे ही फार महत्वाचं असतं असं वाटतं. बऱ्याचदा अशा मदती या जात-धर्म- प्रांत यावर ही ठरतात. राजकीय दृष्टीकोनातून पंचनामे होतात याची अनेक उदाहरणं मी पाहिलीयत. मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याच्या मतदारसंघातल्या नुकसानीचे पंचनामे ग्रामपंचायतीच्या कार्यालयात बसून एका दिवसांत पूर्ण झाल्याची बातमी आमच्या प्रतिनिधीने दिली होती. त्याच मतदारसंघाच्या शेजारच्या शेतकऱ्यांना काहीच मदत मिळाली नव्हती. शेतात नसलेल्या पिकाला पण नुकसानभरपाई मिळाल्याची असंख्य उदाहरणं समोर आहेत. हे पाहिलं की मन अस्वस्थ होतं.
ज्याचं नुकसान झालंय त्याला मदतीसाठी या निकषांवर स्वत:ला सिद्ध करून घ्यावं लागत असेल तर अस्मानी परवडली पण सुलतानी नको असं म्हणायची पाळी शेतकऱ्यांवर येते ती उगीच नाही. राज्यात आणि केंद्रात सत्तेवर असलेल्यांनीही शेतकऱ्यांच्या हिताचा व्यापक विचार केला पाहिजे. चिल्लर राजकीय स्वार्थ बाजूला सारून अशा आपत्तींकडे पाहिलं पाहिजे. गर्दीतल्या एका तरूणाला “श्यूsss श्यू ssssss” करून गप्प बसवताही येईल एक वेळ पण जेव्हा जनमताचा फेरा उलटेल तेव्हा शी-सू च्या संवेदनाही जागेवर राहणार नाहीत..
यंदाच्या वर्षी चांगला पाऊस पडेल असा अंदाज वेधशाळेने वर्तवलाय. कृषीउत्पादनात 30 टक्क्यांनी वाढ होईल असाही अंदाज आहे. पण यापुढच्या काळात पावसाळा एक महिना पुढे सरकणार असल्याचंही समोर येतंय. ऋतुचक्र बदललंय. यापुढे अस्मीनी कहर वाढत जाईल असंच दिसतंय. अशा परिस्थितीत जरा सुलतानी कहर कमी करता आला तर निदान शेतकऱ्यांना दिलासा तरी मिळेल...
नाहीतर नेत्यांची आश्वासनं..दौरे.. नापीकी- मुलींची लग्नं-दुष्काळ- अवकाळी- गारपीट... कीटनाशकांचे डब्बे..गळफासाच्या दोऱ्या आणि एक्सापयरी डेट टाकलेल्या चिठ्ठ्या याचा सिलसिला महाराष्ट्रासाठी नवीन नाहीय. मला अनेक जण विचारतात, शेतकऱ्यांना न्याय कधी मिळेल.. मला गर्दीच्या जोरावर गर्दीतल्याच गप्प बसवण्यात आलेल्या तरूणाचा चेहरा आठवतो....ज्या दिवशी त्या तरूणाकडे विचारण्यासाठी प्रश्न असणार नाही, त्या दिवशी शेतकऱ्यांना न्याय कधी मिळेल या प्रश्नाचं उत्तर ही सापडेल..।
सध्यातरी माझ्याकडेही या प्रश्नाचं काहीच उत्तर नाहीय.
रविंद्र आंबेकर
Post a Comment