01 एप्रिल : लातूर जिल्ह्यात एका 50 वर्षांच्या महिला सती गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. औसा तालुक्यातील लाहोट इथल्या एका विवाहितेने पतीच्या चितेवर उडी घेऊन आत्महत्या केली आहे. अंत्यसंस्कारानंतर दुसर्या दिवशी हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला.
उषा तुकाराम माने (वय-50), असं आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. उषा यांचे पती तुकाराम माने (वय-55) यांचे रविवारी संध्याकाळी हृदय़विकाराने निधन झाले होते. सोमवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पण अंत्यसंस्कार केल्यानंतर रात्रीच्या वेळेस कुटुंबियांची नजर चुकवून उषा घराबाहेर पडल्या आणि थेट पतीच्या चितेवर उडी घेतली. सकाळी कुटुंबियांसह त्यांचे नातेवाईक राख भरण्यासाठी गावच्या स्मशानभूमीत गेले असता त्यांना उषा या अर्धवट जळालेल्या आणि मृतावस्थेत आढळून आल्या. त्यामुळे उषा या सती गेल्याची जोरदार चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे. माने दाम्पत्यांना दोन मुले आहे. दरम्यान, उषा यांच्या सती जाण्याच्या चर्चेने महसूल खात्याचे उपविभागीय अधिकारी आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली असून पुढील तपास पोलीस करताहेत.
Post a Comment