0

  राहुल भाकरे

तालुक्यात एक सहकारी व तीन खाजगी साखर कारखान्यांमुळे तालुक्यातील ऊस उत्पादकांना न्याय मिळाला आहे. आतापर्यंत १९ लाख मे. टन उसाचे गाळप झाले असून तीन लाख मे. टन उस गाळपाअभावी शिल्लक असून १५ मे पर्यंत तीन कारखाने सुरू राहणार असून या कारखान्यांकडून तालुक्यातील पूर्ण उसाचे गाळप करण्याचे नियोजन झाले आहे.मंगळवेढा तालुक्यात उजनीच्या पाण्यामुळे उसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. सुरूवातीला श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना हा एकच कारखाना असल्यामुळे तालुक्यातील शिल्लक उसासाठी इतर कारखान्याच्या मागे शेतकर्‍यांना लागावे लागत होते. परंतु, युटोपियन शुगर, फॅबटेक शुगर, भैरवनाथ शुगर युनिट नं. ३ या कारखान्यांमुळे तालुक्यातील शेतकर्‍यांचे गाळपाअभावी राहणार्‍या उसाचे नुकसान थांबले आहे. या चारही कारखान्याकडून आपापल्या परीने गाळपाचे नियोजन व्यवस्थितरित्या करण्यात आले आहे. आजअखेर दामाजीकडून ३ लाख ८५ हजार मे. टन गाळप झाले आहे. 'युटोपियन शुगर'कडून तीन लाख ८0 हजार मे. टन तर 'फॅबटेक शुगर'कडून सहा लाख ३२ हजार मे. टन उसाचे गाळप झाले आहे. लवंगी येथील 'भैरवनाथ शुगर'कडून तीन लाख ९४ हजार मे. टनाचे गाळप झाले आहे. दामाजी कारखान्याकडून कार्यक्षेत्रातील उस तोडणीला प्राधान्य दिले असले तरी कारखान्याकडे एक लाख मे. टन इतका उस शिल्लक आहे. प्रामुख्याने ब्रह्मपुरी, बठाण, सिद्धापूर, अरळी या नदीकाठच्या भागातील उस काही प्रमाणात गाळपाअभावी शेतकर्‍यांकडून लवकर नेण्यासाठी कारखाना प्रशासनाचे उंबरे झिजवले जात आहेत. तर काही शेतकरी उसाचा फड जाळून जळीत उस गाळपासाठी पाठवत आहेत. युटोपियन शुगरकडे सव्वा लाख मे. टन उस शिल्लक आहे. तर फॅबटेककडे ७५ हजार मे. टन उस गाळपासाठी उपलब्ध आहे. हे तिन्ही कारखाने १५ मे पर्यंत सुरू राहणार असून सर्व उस गाळप केल्याखेरीज कारखान्याची धुराडे बंद होणार नाहीत. तालुक्यातील चारही कारखान्याकडून एफआरपीप्रमाणे अद्यापपर्यंत दर दिला नाही. शासनाकडून केवळ एफआरपीप्रमाणे दर न देणार्‍या कारखान्यांवर कारवाईची घोषणा केली जात असली तरी प्रत्यक्षात मात्र काहीच केले जात नसल्याने चालू वर्षी उसाला किती भाव मिळणार? याबाबत शेतकर्‍यांमधून संभ्रम आहे.

Post a Comment

 
Top