0

करकंब : पंढरपूर ते टेंभूर्णी या मार्गावर रात्री चोरीच्या वाळूची मोठय़ा प्रमाणावर वाहतूक सुरू आहे. भारक्षमतेपेक्षा अधिक वाळू वाहतूक होत असल्यामुळे रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. पंढरपूर ते टेंभूर्णी या मार्गावर रात्री १0 वाजलेपासून पहाटे ६ वाजेपर्यंत वाळूची चोरट्या मार्गाने बेसुमार वाहतूक होत आहे. ही सर्व वाहतूक अधिकृत नव्हे तर अनधिकृतपणे महसूल प्रशासनाच्या आशिर्वादाने चालणार्‍या चोरट्या वाळू उत्खननातून होत आहे. पंढरपूर तहसिलदारांसह जिल्हा प्रशासनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. परिणामी भीमा नदीचे नैसर्गिक वैभव तर लुटले जातच आहे. शिवाय शासनाचा कोट्यवधी रूपयाचा महसूलही प्रशासनाच्या मदतीने लुटला जात आहे. ज्या ठिकाणी अनधिकृतपणे वाळूचे उत्खनन चालते त्या ठिकाणाहून प्रत्येक गाडीला ठराविक रक्कम आकारली जात असल्याची चर्चा महसूल कर्मचार्‍यांमधूनच ऐकायला मिळत आहे. पंढरपूर तालुक्यातील उंबरे, नांदोरे, नेवरे, आव्हे, पेहे, करोळे, बादलकोट, शेळवे, देवडे, खेडभोसे, पटवर्धन कुरोली या भागातून चोरटी वाळू उत्खनन व वाहतूक मोठय़ा प्रमाणात चालू आहे. शेतकर्‍यांना शेतातून वाहन काढण्यासाठी वाहनमालक पैसे देतात. नदीकाठच्या शेतकर्‍यांनाही विनाश्रम पैसा मिळू लागल्यामुळे तेही याविरोधात आवाज उठवताना दिसत नाहीत. करकंब येथून एका रात्रीत सुमारे ५00 ट्रकची चोरटी वाळू वाहतूक होत असल्याची खात्रीशिर माहिती सुत्रांनी दिली. या वाहतूकीमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. शासनाचा कोट्यवधीचा महसूल चिरीमिरीसाठी महसूल प्रशासनातील काही ठराविक लोक बुडविताना दिसत आहेत. कारवाई मात्र नावालाही केली जात नाही.

Post a Comment

 
Top