0




'हिट अँड रन' प्रकरणी अभिनेता सलमान खानला सेशन्स कोर्टानं सुनावलेल्या शिक्षेला मुंबई हायकोर्टानं स्थगिती दिल्यानंतर, बॉलिवूडमध्ये आनंदाला उधाण आलं असलं तरी सुजाण जनतेतून या निकालाबद्दल नाराजीचाच सूर ऐकू येतोय. त्यांच्या याच तीव्र भावना मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि भाजप खासदार सत्यपाल सिंह यांनी जाहीरपणे व्यक्त करून न्यायव्यवस्थेवर कोरडे ओढलेत. आपल्या देशात गरिबांना न्याय मिळत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

१३ वर्षं जुन्या, बहुचर्चित हिट अँड रन खटल्यात 'दबंग' अभिनेता सलमान खानचा दोनच दिवसांपूर्वी 'निक्काल' लागला होता. सलमानसारख्या सेलिब्रिटीला पाच वर्षं सक्तमजुरी आणि २५ हजारांचा दंड ठोठावून सेशन्स कोर्टानं न्यायव्यवस्थेची ताकदच दाखवून दिली होती. अर्थात, काही तासांतच त्यानं जामीन मिळवून घर गाठल्यानं सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण सलमानवर तुरुंगवारीची टांगती तलवार कायम होती. त्याच्या अंतरिम जामिनाची मुदत आज संपत असल्यानं, सलमानची रवानगी तुरुंगात होणार की त्याला जामीन वाढवून मिळणार, याबद्दल सिनेसृष्टीसह सगळ्यांनाच उत्सुकता होती. अशातच, हायकोर्टाचे न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी अगदीच अनपेक्षित निकाल दिला. सलमानच्या शिक्षेला स्थगिती देत त्यांनी ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याला जामीन मंजूर केला. त्यामुळे सलमानला मोठ्ठा दिलासा मिळाला, त्याचे कुटुंबीय खुश झाले, बॉलिवूड आनंदले आणि चाहते तर वेडावलेच; पण दुसरीकडे कोर्टाच्या या निकालावर टीकेची झोडही उठली आहे. सोशल नेटवर्किंगवरून नेटकरी तीव्र संताप व्यक्त करत आहेत. सत्यपाल सिंह यांनी या भावनांनाच वाट मोकळी करून दिली.

सलमानला शिक्षा झाली, तेव्हा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास वाढला होता. पण, आजच्या निकालानं पुन्हा निराशा केली आहे. पैशाच्या जोरावर श्रीमंत व्यक्ती हायकोर्टात जातात, तिथेही आपल्या बाजूने निकाल न लागल्यास सुप्रीम कोर्टात जातात, पण गरिबांना मात्र न्यायाची वाटच बघावी लागते. बऱ्याचदा त्यांना न्याय मिळतच नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, सलमान प्रकरणी हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात अन्य कोणत्याही नेत्यानं किंवा मोठ्या अधिकाऱ्यानं थेट टिप्पणी केलेली नाही.

Post a Comment

 
Top