0
  मंगळवेढा / प्रतिनिधी 
 मरवडे (ता.मंगळवेढा) येथे बोगस वैद्यकीय व्यवसाय करणार्‍या आशिषकुमार सुन्ना याच्याविरूध्द पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. दि. २ जुन रोजी जिल्हाधिकारी यांनी आरोग्य अधिकार्‍यांची बैठक घेवून जिल्ह्यात बोगस वैद्यकीय व्यवसाय करणार्‍या व्यक्तींविरूध्द गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे दि.१७ रोजी दुपारी १ वाजता मरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात बाह्यरूग्ण तपासणी करीत असताना रूग्ण प्रभाकर महादेव कावळे (वय २३) हा येथे आला. त्याने बोगस डॉक्टर सुन्ना यांच्याकडून उपचार घेतलेली चिठ्ठी आणली होती. यावरून गटविकास अधिकारी एम.बी. कोळी, आरोग्य विस्तार अधिकारी एस.एस. शिंदे, पी.एस. पवार यांनी श्री येशु सर्मथ क्लिनीक असा बोर्ड लावलेल्या ठिकाणाला भेट दिली असता ४ रूग्णांना सलाईन लावून उपचार सुरू होते. यावेळी पथकाने कागदपत्राची तपासणी केली असता आधुनिक अँलोपॅथीक पध्दतीचे अवैधरित्या उपचार करीत असल्याचे निदर्शनास आले. आरोग्य अधिकारी डॉ.नंदकुमार महादेव शिंदे यांनी याबाबतची पोलीसात फिर्याद दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिषकुमार सुन्ना यांच्याविरूध्द सन २00८ व २0१३ यासाली दोनवेळा गुन्हे दाखल करण्यात आले असून हा तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

 
Top