0

मंगळवेढा / प्रतिनिधी येड्राव (ता. मंगळवेढा) येथील जिल्हा दूध संघाचे माजी संचालक बाळासाहेब शिंदे यांच्या मालकीच्या असणार्‍या पशुखाद्य कारखान्यात मीटर बायपास करून वीज चोरी केल्याप्रकरणी महावितरण कंपनीने १ लाख १0 हजाराचा दंड आकारत महावितरणच्या लातूर येथील पोलीस ठाण्यात शिंदे यांच्या विरोधात वीज चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. महावितरणच्या बारामती विभागाचे मुख्य अभियंता रामराव मुंढे व सोलापूरचे अधिक्षक अभियंता संजय साळे यांच्या मार्गदर्शनाखाली वीज चोरांविरोधात मंगळवेढय़ात कडक कारवाई सुरू केली आहे. गेल्या चार दिवसापासून महावितरण कंपनीकडून ५५ चोर्‍या पकडल्या असून दंडात्मक कारवाई करत लातूर येथे गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. दि. ३ रोजी येड्राव येथील जिल्हा दूध संघाचे माजी संचालक बाळासाहेब शिंदे यांच्या मालकीचा पशुखाद्य कारखाना असून येथे वीजेच्या वापराबाबत शंका आल्याने उपकार्यकारी अभियंता सुभाष कोळेकर, सहाय्यक अभियंता प्रशांत माने व इतर कर्मचार्‍याच्या मदतीने मीटर तपासणी केली असता मीटर बायपास करून वीज चोरी होत असल्याचे आढळून आले. ही चोरी गेल्या दोन महिन्यापासून सुरू असून सुमारे ७ हजार युनिट वीजेची चोरी झाल्याचे आढळून आल्याने शिंदे यांना १ लाख १0 हजाराचा दंड आकारत लातूर येथील पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वीज चोरीच्या वाढत्या घटनांमुळे महावितरणकडून वीज चोरांविरोधात कडक मोहिम राबवली जात आहे. गेल्या काही दिवसापूर्वी नंदेश्‍वर येथील बाळकृष्ण डेअरीमध्ये वीज चोरी निदर्शनास आल्यामुळे त्यांना महावितरणने ३२ लाखाचा दंड आकारला होता.

Post a Comment

 
Top