सोमवार, २५ मे, २०१५
मुंबई : ऑगस्ट ते ऑक्टोबर 2015 या कालावधीत मुदत संपणाऱ्या 32 जिल्ह्यांमधील सुमारे आठ हजार 837 ग्रामपंचायतींच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार ग्रामपंचायत प्रभागनिहाय मतदार याद्यांवर 1 ते 6 जून या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिली आहे.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, मतदार याद्यांचा हा कार्यक्रम विविध ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील लागू आहे. यासाठी 18 मे 2015 रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार याद्या ग्राह्य धरण्यात येणार आहेत. या याद्यांवरून तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतीच्या प्रभागनिहाय मतदार याद्या 1 जून 2015 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. त्यावर 6 जून 2015 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. 13 जून 2015 रोजी ग्रामपंचायत प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील.
ऑगस्ट ते ऑक्टोबर 2015 या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्हानिहाय ग्रामपंचायतींची संख्या अशी: ठाणे- 3, रायगड- 19, रत्नागिरी- 1, पालघर- 2, नाशिक- 16, धुळे- 220, नंदूरबार- 26, जळगाव- 776, अहमदनगर- 759, पुणे- 705, सोलापूर- 128, सातारा- 710, सांगली- 96, कोल्हापूर- 417, औरंगाबाद- 589, परभणी- 524, हिंगोली- 467, बीड- 92, नांदेड- 280, उस्मानाबाद- 423, लातूर- 7, अमरावती- 23, बुलढाणा- 523, अकोला- 222, वाशीम- 163, यवतमाळ- 494, नागपूर- 137, वर्धा- 32, भंडारा- 155, चंद्रपूर- 639, गडचिरोली- 4 आणि गोंदिया- 185.
Post a Comment