0


अनैतिक संबंधातून खून झाल्याचा पोलिसांना संशय ?
सुमारे डझनभर महिलांची चौकशी?

लक्ष्मीदहिवडी / प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मीदहिवडी येथे शनिवारी भर दुपारी झालेल्या रामेश्‍वर जुंदळे यांच्या हत्त्येने सर्वत्र खळबळ उडाली असून आता ग्रामस्थांचे व तालुक्यातील लोकांचे लक्ष पोलिसांच्या तपासावर लागले आहे. खून होऊन पाच दिवस होऊनही पोलिसांना अद्याप ठोस धागेदोरे लागले नसल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे. शनिवारी दुपारी १२.३0 च्या सुमारास लक्ष्मीदहिवडीपासून एक कि.मी.च्या अंतरावर चौघा संशयितांनी रामेश्‍वर जुंदळे यांचा गोळ्या घालून खून केला होता. रामेश्‍वर जुंदळे यांचे गावात कुणाशी भांडण, वैर नव्हते. त्यामुळे या खूनाने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. मात्र, हा खून अनैतिक संबंधातून झाला असल्याचा संशय पोलिसांना असल्याने जुंदळे यांच्या संपर्कातील प्रत्येक महिलेची कसून तपासणी करण्यात येत असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत सुमारे डझनभर महिलांना ताब्यात घेऊन चौकशी केल्याचे दिसत आहे तर काही पुरूषांनाही ताब्यात घेतले आहे. जुंदळे यांना फोन केलेल्या प्रत्येक व्यक्तींना चौकशीसाठी बोलविल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत तर काहीजणांनी पोलीस स्टेशनची कधी पायरीही चढली नाही, अशांनाही चौकशीला नेल्याने ते गांगारून गेल्याचे दिसत आहे. चौकशी झालेल्या महिलांच्या कुटुंबामध्येही संशयावरून कलह निर्माण होण्याची शक्यता ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

Post a Comment

 
Top