डॉ. अमोल अन्नदाते
सगळीकडे ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू आहे. काही तर ग्रामपंचायत हा लोकशाहीचा सगळय़ात महत्त्वाचा व मोठा पाया आहे. घटनेमध्ये पंचायतराजला खूप महत्त्व देण्यात आले आहे; पण ही ग्रामपंचायत जितकी महत्त्वाची तितकाच आपण तिचा कचरा केला आहे. गावोगाव रोज रिकाम्या होणार्या देशीच्या बाटल्यांमध्ये आज ग्रामपंचायत निवडणूक अडकून पडली आहे. अनेक वर्षांपूर्वी राजीव गांधी यांनी सुचवले की गावोगावचा सरपंच जर हुशार झाला तर देशाचा कायापालट होईल. त्यांनी देशभरातील सरपंचांची परिषद बोलावली; पण याचा तत्कालिक परिणाम झाला. आज आपण आपल्या गावात विकास झाला नाही, होत नाही असा गळा काढतो. मंत्री, राज्यपातळीवरच्या व राष्ट्रीय नेत्यांना शिव्या देतो; पण आपण ग्रामपंचायतीची निवडणूक लढवताना कशी लढवतो, कसे मतदान करतो यावर विचार करत नाही. असे म्हणतात की, एकवेळ आमदार-खासदार होणे सोपे पण ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच होणे त्यापेक्षा कितीतरी अवघड़ कारण या निवडणुकीत गावातील प्रत्येक उंबरठय़ाला महत्त्व असते. उमेदवार ठरवतानापासून हा गोंधळ सुरू होतो. लोकांना हुशार शिकलेला उमेदवार नको असतो. त्यांना अंगठेबहाद्दर मानखाली घालून ग्रामसभेच्या थरावर गपगुमान अंगठा लावणारा उमेदवार हवा असतो. उमेदवार ठरवताना अशा उमेदवाराच्या नावावर लगेच सहमती होते. आज ही जवळपास ३0 टक्के ग्रामपंचायत सदस्य हे अशिक्षित आहेत, फक्त लिहिता-वाचता येणाराच उमेदवार पाहिजे असे ठरवून जाहीर करून बघा बारा गाव मध्ये. पाहा म्हातारे कोतारेही पाटी, पेन्सील घेऊन शाळेत जाऊन बसतील. एखादा शिकलेला पुढे येऊ लागला की गावातील चार-दोन दीडशाहान्या तज्ज्ञांना ते नको असते. हे तागे असे असतात ज्यांना निवडणूक न लढवता आपल्या हातातला बाहुला सरपंच म्हणून हवा असतो. अशांना ग्रामीण भाषेत व्हिलेज बॅरिस्टर म्हणतात. अंगठे बहाद्दर सरपंच बसवायचा आणि त्याला ग्रामसभेत हवे तिथे अंगठा लावायला सांगायचे आणि पैसे खाऊन गावाचे वाटुळे करायचे. परत त्या सरपंचाच्याच नावाने बोबाबोंब करायची. तोपर्यंत पुढच्या निवडणुकीसाठी नवा श्याम्या शोधून ठेवायचा. आधी अशा व्हिलेज बरिस्टर लोकांना ओळखून त्यांना ग्रामपंचायत निवडणुकीतून हद्दपार करा. काही सरपंच स्वत:च स्वत:च्या डोक्याने गाव कसा खड्डय़ात घालता येईल आणि घर कसे भरता येईल ते पाहतो. एक गावाचे उदाहरण ऐकण्यात आले की, एका सरपंचाने दोन देशी घेऊन गरम सभेत एक बोअर एका शेतकर्याला देऊन टाकला. दोन देशीच्या बदल्यात गाव विकायला निघालेल्या सरपंचावर ग्रामसभेत सदस्य अविश्वास आणून त्याला घालवू शकतात; पण सगळे सदस्य मिळून खाऊ म्हणून हे होत नाही. असे झाले तरी गावतील २0 टक्के जनता मिळून सरपंचावर गट विकास अधिकार्याच्या माध्यमातून अविश्वास आणू शकते; पण त्यासाठी गावातील २0 टक्के लोकांनी तरी कर भरलेला असायला हवा. आता असे गाव कुठे सापडेल म्हणजे आपण आपल्या वागणुकीतूनच आपला हक्क गमावून बसलो आहोत. निवडणुकीच्या वेळी मतदान करताना लोक कुठल्या गोष्टी लक्षात घेऊन मतदान करतात हे आपणच तपासून पाहा. कोण विकास करेल हा मुद्दा तर मतदान करताना कधीच विचारात घेतलेला नसतो. याने मला लग्नाची पत्रिका दिली होती का? हा आपल्या लग्नाला, बारशाला, मुंजीला, मौतीला, दहाव्याला आला होता का. त्याच्या बापाच्या दहाव्यात याने माझ्या ताटात कमी बुंदी वाढली, याच्या पोरीच्या लग्नात याने मला पंगतीतून उठवले. असे वैयक्तिक भांडणे, हेवेदाव्यांचे निकष लावून मतदान करण्यात येते. शिवाय हा आपल्या भाऊबंदकीतला, हा माझ्या वाड्यावरचा असे फालतू निकष लावूनच ९0 टक्के मतदान होते, असे केल्यावर आपल्या गावाचा विकास कसा होणार. जातीच्या राजकारणाची कीड तर दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळीकडेच लागली आहे त्यामुळे त्याबद्दल बोलण्यात काही अर्थच नाही. दुसरी लाजिरवाणी गोष्ट म्हणजे या निवडणुकीत वाहणार्या दारूच्या नद्या. रोज सकाळी बाह्यरुग्ण विभागात देशी पिऊन उलट्या झाल्यामुळे एक-दोन रुग्ण तरी भेटतात. रोज देशीचे कॅरेटच्या कॅरेट गावात रिकामे होतात. असे केल्यावर दुष्काळ पाण्याचा की बुद्धीचा हेच कळत नाही. असे दारूच्या बदल्यात पण मतदान केले तरी किती ही पाऊस झाला तरी आपण दुष्काळीच राहणार. मुळात ग्रामसभा सशक्त झाली तरी आपल्याला गावाच्या विकासासाठी कोणाचीच गरज राहणार नाही. सरपंचाला बर्याच योजना माहीतच नसतात. कित्येक सरपंचांना जिल्ला परिषद कुठे आहे हे ही माहीत नसते. निवडून आल्यावर सगळय़ा सरपंचांचे यशदा या सरकारी संस्थेमार्फत प्रशिक्षण घेण्यात येते; पण त्याचा कितपत उपयोग होतो हे माहीत नाही. कारण बराच निधी तसाच वाया जातो. ग्राम सभेचे अधिकार अजून गावाला माहीत नाही. दरवर्षी दारूमुळे कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त होतात. गावातील सगळय़ा बायका जरी एकत्र आल्या तरी ग्राम सभा गावात दारूबंदीचा निर्णय घेऊ शकते. गावात बिअरबार उघडण्यासाठी सरपंचाचे नाहरकत प्रमाणपत्र लागते. आपणच आपले कुटुंब उद्ध्वस्त करण्यासाठी ही नाहरकत देत असतो. गोल्वादी या वैजापूर तालुक्यातील गावाने असे प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आणि तिथे बिअरबारला रोखले. सभा सशक्त झाल्यामुळे नगरचे हिवरे बाजार, औरंगाबादचे पांगरा, पाटोदा, कन्नडचे बहिरगाव असे कितीतरी गावांचे कायापालट झाले आहे. थोडक्यात ग्रामपंचायत निवडणूक आपण गांभीर्याने घेतली तर आपल्या गावाचा व आपला विकास आपोआप होईल. - संपर्क : ९४२0६२५८२६
Post a Comment