मंगळवेढा तालुक्यातील पश्चिम टोकाला असलेल्या महमदाबाद (शे) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ७ जागेवर १४ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यामध्ये गत विधानसभेच्या परिचारक विरूद्ध आ. भालके-आवताडे गटाकडून पॅनल तयार करण्यात आले असून ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे. या निवडणुकीत आवताडे गटाने पाच व आ. भारत भालके यांच्या गटाच्या २ अशा मिळून सात जागा लढविल्या आहेत. या गटाकडून प्रभाग १ मधून उपसरपंच सूर्यकांत पाटील व रूपाली जुंदळे, प्रभाग २ मधून हणमय्या जुंदळे व कोमल सोनवले, प्रभाग ३ मधून सविता नरळे, सचिन बोडके व रूपाली जुंदळे हे निवडणूक लढवत आहेत तर परिचारक गटाकडून प्रभाग १ मधून पद्मिनी म्हमाणे व कांचन जुंदळे, प्रभाग २ मधून सीताबाई सोनवले व सरस्वती सुडके, प्रभाग ३ मधून लक्ष्मी करांडे, बसवेश्वर सुडके व सविता जुंदळे हे उमेदवार नशीब आजमावत आहेत. या निवडणुकीसाठी एकूण २६ अर्ज दाखल झाले होते. त्यामधील दोन अर्ज नामंजूर झाले तर दहा जणांनी माघार घेतली आहे. या गावची निवडणूक लागल्यापासून अनेक घडामोडी घडत असून विधानसभेला एकत्रित प्रचार केलेले अनेकजण दुसर्या गटात गेल्याचे पहावयास मिळत आहे. या गटातून त्या गटात अनेकांनी कोलांटउड्या मारल्याचे दिसत आहे. विधानसभेच्यावेळी परिचारक गटाचे काम केलेले दीपक सुडके, सुभाष सुडके, नवनाथ सुडके, बंडू सोनवले, मल्लिकार्जुन जुंदळे यांनी मिळून पॅनल उभे केले असून आ. भालके गटाच्या संतोष सोनवले यांनी परिचारक गटात उडी घेतली आहे तर आवताडे गटाकडून सरपंच योगेश नरळे, उपसरपंच सूर्यकांत पाटील, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन बबन म्हमाणे, तंटामुक्ती अध्यक्ष भीमराव पाटील, बंडू जुंदळे, प्रशांत शिलवंत, सचिन सोनवले, राजाराम नरळे व विजय कांबळे, पांडु जुंदळे, विक्रम सुडके यांनी मिळून आ. भालके गटाच्या बसवेश्वर सुडके, नामदेव रोकडे या सर्वांनी मिळून एक पॅनल उभे केले आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत सुभाष सुडके व दीपक सुडके हे पारंपारिक विरोधक यंदा एकत्रित निवडणूक लढवत आहेत. विधानसभेच्या मतांची आकडेवारी पाहता सध्यातरी आवताडे-आ. भालके गटाचे पारडे जड दिसत असले तरी या मिनी मंत्रालयाची चावी कोणाच्या हातात द्यायची हे मतदारच ठरविणार आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment