नंदेश्वर / प्रतिनिधी महिनाभरावर आलेल्या नंदेश्वर (ता. मंगळवेढा) विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीने गावातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. चार महिन्यावर येणार्या ग्रामपंचायत निवडणुकीची ही रंजीत तालीम असल्याने सर्वच गट-तट या निवडणुकीत सर्व ताकदीनिशी उतरणार असल्याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रीय समाज पक्षाने या निवडणुकीची तयारी केल्याने या निवडणुकीला महत्त्व आले आहे. कसल्याही परिस्थितीत निवडणूक लढविणार असल्याचे रासपचे कार्यकर्ते सांगत आहेत. याआधी झालेल्या निवडणुका बिनविरोधच झालेल्या आहेत. आतापर्यंत आवताडे गटाचेच निर्विवाद वर्चस्व राहिलेले आहे. पण, यावेळी मात्र ही निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे धुसर होण्याच्या मार्गावर आहेत. सोसायटीची निवडणूक झाल्यानंतर लगेचच ग्रामपंचायतीची निवडणूक असल्याने प्रत्येक गट आपापले अस्तित्व निर्माण करण्याचा प्रय▪करत आहे. या निवडणुकीतूनच ग्रामपंचायत निवडणुकीच्या दिशा ठरणार आहेत. त्यामुळे चौकाचौकात, हॉटेलात, पानटपरीवर, पारावर चर्चा सुरू आहेत. गत विधानसभा निवडणुकीमध्ये समाधान आवताडे यांनी शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढविली. पण या काळात आवताडे गटाचे नंदेश्वरातील ज्येष्ठ नेत्यांशी जुळले नसल्याने या नेत्यांनी आवताडे यांच्या विरोधात गेल्याने आवताडे गटालाही सोसायटी निवडणुकीत अडचणी येणार आहेत. सोसायटीचे विद्यमान चेअरमन रामभाऊ नरूटे यांचे राष्ट्रीय समाज पक्षाशी सलोख्याचे संबंध आहेत. राष्ट्रीय समाज पक्षा व्यतिरिक्त निवडणूक लढविण्यासाठी अजून कोणीच समोरासमोर बोलत नाही. मात्र, त्यांना पाठिंबा देणारे बरेच येतील. गावातील आ. भारत भालके गट, परिचारक गट हे दोन्ही गटही निवडणूक लढविण्यासाठी उत्सुक आहेत. आवताडे गट निवडणूक बिनविरोध करण्यावरच भर देणार आहे. त्या दृष्टीने ज्या त्या गटाच्या नेत्याशी ते संपर्क ठेऊन आहेत. ग्रामपंचायतीची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊनच प्रत्येक गट तयारी करीत असल्याने निवडणूक लागण्याचीच चिन्हे असल्याची चर्चा ग्रामस्थांमधून होत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment