पंढरपूर / प्रताप राठोड
पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा भागामध्ये सध्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण होत आहे. पाणी नसल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थतीला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. पाण्यावाचून नागरिकांचे हाल होत आहे, तर जनांवराच्या चार्यांचा प्रश्न अधिक गंभीर बनत चालला आहे. राज्यामध्ये सर्वाधिक साखर कारखाने असलेल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक उत्पादन होत असताना साखर उद्योग देखील अडचणीमध्ये आला आहे. याचा परिणाम बाजारपेठ, इतर व्यवसाय आणि उद्योगावर देखील होत आहे. अशी परिस्थिती केवळ उजनी धरणामध्ये पाणी नसल्यामुळे येत आहे. पण सोलापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट, मराठवाडयालाही कायम पाणीपुरवठा करणारी कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना झाली असती तर अशी परिस्थिती आली नसती याबाबत आता जिल्ह्यातील शेतकर्यामधून भावना व्यक्त होत आहे. माजी उपमुख्यमंत्री खा. विजयसिंह मोहितेपाटील यांनी सोलापूरसह, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडयाचाही विचार करून भविष्यकालीन कृष्णा - भीमा स्थिरीकरण योजनेची संकल्पना मांडली. राज्यामध्ये आघाडीचे सरकार असल्यापासून या योजनेबाबत पाठपुरावा चालू आहे, पण शेवटी येथेही पाणीदार राजकारण पुढे येवू लागले आणि एक प्रवाह याला विरोध करू लागला. पण मुळात या योजनेचे पाणी एका ठराविक व्यक्ती किंवा पक्ष याला न मिळता सर्वांनाच मिळणार होते. पण केवळ श्रेयवादामध्ये हा विषय मागे पडला. गेल्या पाच ते सहा वर्षापासून याबाबत मागणी होत आहे. काहीही न करण्यापेक्षा काहीतरी करणे योग्य हे या ठिकाणी नमूद करावयासे वाटते. सोलापूर जिल्ह्यामध्ये सातत्याने सलग तीन वर्षापासून दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होत आहे. साततत्याने पडणारा दुष्काळ हटवण्यासाठी केवळ टॅंकर हा पर्याय राहणार नाही. यासाठी भविष्यकालीन योजना राबवणे महत्वाचे आहे. पण दुष्काळ आल्यानंतर वेळ मारून नेण्याचा प्रय▪सरकाराकडून होत आहे. अशी परिस्थिती भविष्यिामध्येही येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण भविष्यकालीन उपाययोजना करण्याबरोबर केवळ तात्पुरती मलमपट्टी करण्यात येत आहे. उजनी धरण भरण्याबाबत टेल टू हेड चा कायदा असताना या कडेही दुर्लक्ष करण्यात येत आहे. उजनी धरणावरील इतर धरणामध्ये पाणी सोडण्यात येत आहे पण उजनी धरणामध्येच पाणी का सोडण्यात येत नाही याचा जाब सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांनी विचारणे आवश्यक आहे. कायद्याचा बडगा हा फक्त सोलापूर जिल्ह्यासाठीच आहे का याचा जाब विचारण्याची जबाबदारी प्रामूख्याने पालकमंत्र्याची आहे. पण राज्याज्या राजकारणामध्ये त्यांचे वजन कमी पडत असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे उजनीच्या पाण्यासाठी लातूर आणि सोलापूर असा वाद पेटण्यास सुरूवात झाली आहे. पाणी प्रश्नावरून तिसरे महायुद्ध होईल अशी भविष्यवाणी होत असताना त्यांची ही नांदी तर नाही ना अशी शंकाही या निमित्ताने होत आहे. अशीच शंका कृष्णा - भिमा स्थिरीकरण योजना झाली असती तरी अशी परिस्थिती निर्माण झाली नसती असे भविष्यामध्ये वाटले तर यामध्ये नवल मानू नका. कारण ही मनुष्याची आणि पर्यायांनी राज्यकर्त्यांची चूक आहे.
Post a Comment