0


फडणवीसांच्या गाडीसमोर महिलेचं लोटांगण
सोलापूर:
उपाशी मरण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांच्या गाडीखाली येऊन मेलेलं बरं, असं म्हणत सोलापुरात एका महिलेने थेट मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर लोटांगण घातलं. जातपडताळणीच्या मुद्द्यावरून नोकरीतून कमी केल्याने, हताश झालेल्या भारती कोळी यांनी थेट जीवघेणा पवित्रा घेतला.
 
यापूर्वीच्या दौऱ्यात मुख्यमंत्र्याना चारवेळा निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र निवेदन देऊ न शकल्याने, भारती कोळी यांनी आज थेट मुख्यमंत्र्याच्या गाडीसमोर रस्त्यावर लोटांगण घातलं.

काय आहे प्रकरण?

भारती कोळी या शिक्षिका आहेत. मात्र जातप्रमाणपत्र अवैध ठरल्याने भारती कोळी यांना सहा वर्षांपूर्वी नोकरीतून कमी करण्यात आलं आहे. त्यांनी दहा वर्षे नोकरी केल्याचा दावा केला आहे.

भारती कोळी यांची मागणी

मी दहा वर्षे नोकरी केली आहे. जर तीन वर्षे सेवा बजावली तर कोणालाही नोकरीवरून कमी करता येत नाही, त्यामुळे मला नोकरीतून कमी करणं  गैर आहे, असा दावा भारती कोळी यांचा आहे.
 
कागदोपत्री मी कोळी सिद्ध करण्यास असमर्थ ठरत असले, तरी ओबीसी, एससी यांसारख्या जातीत रुपांतरीत होऊ शकते, त्यामुळे माझ्या मागणीचा विचार व्हायला हवा, असं कोळी यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर लोटांगण

या मागणीसाठी भारती कोळी यांनी मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर रस्त्यावर लोटांगण घातलं. त्यामुळे मुख्यमंत्र्याचा ताफा थांबवावा लागला. मुख्यमंत्र्यांनी रस्त्यावर उतरून भारती कोळी यांची मागणी जाणून घेतली.

Post a Comment

 
Top