मुंबई : रविवारी घोषित झालेल्या विधानसभा निवडणूक निकालातून महिलांनीही 'हम भी कुछ कमी नही' हे दाखवून दिले. या निवडणुकीत एकूण १६ महिला उमेदवारांनी विजय मिळवला आहे. यातही भाजपाचीच आघाडी असून या पक्षाच्या सर्वाधिक १0 महिला उमेदवार विजयी झाल्या तर काँग्रेसच्या ५ उमेदवार विजयश्री प्राप्त करण्यात यशस्वी ठरल्या. ज्योती कलानी या राष्ट्रवादीच्या विजयी झालेल्या एकमेव महिला उमेदवार आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल विविधांगाने वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. यात काही नवख्या उमेदवारांनी दिग्गजांचा पराभव केला तर काही राज्याबाहेरील पक्षांच्या उमेदवारांनी येथील प्रस्थापितांना पराभवाची धूळ चारली. शिवसेना आणि मनसे पक्षाची एकही महिला उमेदवार निवडून आलेली नाही. मावळत्या विधानसभेत आमदार राहिलेल्या पंकजा मुंडे आणि माधुरी मिसाळ यांनी अनुक्रमे परळी आणि पर्वती मतदारसंघातून पुन्हा विजय मिळवला. पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या मंदा म्हात्रे आणि विद्या ठाकूर या 'जायंट किलर' ठरल्या. म्हात्रे यांनी नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक यांचा पराभव केला तर विद्या ठाकूर यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचा गोरेगाव मतदारसंघातून पराभव केला. भाजपाच्या अन्य विजयी महिला उमेदवारांत मेधा कुलकर्णी (कोथरुड), डॉ. भारती लव्हेकर (वर्सोवा), मनीषा चौधरी (दहिसर), स्नेहलता कोल्हे (कोपरगाव), मोनिका राजळे (शेवगाव) आणि संगीता ठोंबरे (कैज) यांचा समावेश आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांची पत्नी अमिता चव्हाण यांनी काँग्रेसच्या तिकिटावर नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघातून विजय मिळवला. काँग्रेसच्या अन्य चार महिला उमेदवारांत माजी महिला व बालकल्याण मंत्री वर्षा गायकवाड (धारावी), यशोमती ठाकूर (तेवसा), निर्मला गावीत (ईगतपुरी) आणि प्रणिती शिंदे (सोलापूर शहर मध्य) यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी या उल्हासनगर मतदारसंघातून विजयी झाल्या.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment