लक्ष्मीदहिवडी / दत्तात्रय नवत्रे
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार भारत भालकेंनीच बाजी मारली. हा अटीतटीचा झालेला तिरंगा सामना सर्वांसाठीच लक्षवेधी ठरला. यामध्ये भला मोठा राजकीय वारसा असलेले प्रशांत परिचारक व तीन महिन्यापूर्वीच मैदानात उतरलेले उद्योजक समाधान आवताडे यांना पराभवाची चव चाखावी लागली आहे. जनसंपर्क व कामाच्या जोरावर आ. भारत भालकेंनी विजय मिळविला असला तरी मंजूर केलेली कामे पूर्ण करण्यासाठी, निधी मिळविण्यासाठी फार अट्टाहास करावा लागण्याची शक्यता आहे. कारण, राज्यात विरोधी पक्षाचे सरकार स्थापन होणार असल्याने कामासाठी त्यांना रस्त्यावर उतरण्याचीही वेळ येऊ शकते. या निवडणुकीत आ. भालकेंनी एकला चलो रे म्हणत प्रचार यंत्रणा राबविल्याने विरोधकही आ. भालके हे निवडून येत नाहीत. अशा भ्रमात राहिल्याचे दिसून आले. 'स्वाभिमानी'च्या तिकीटावर लढत असलेले प्रशांत परिचारक, शिवसेनेतून समाधान आवताडे यांनी हायटेक प्रचार यंत्रणा राबविली होती. वेगवेगळ्या मार्गानी त्यांनी मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रय▪केला होता. मात्र, त्यांना पूर्ण अपयश आले. राष्ट्रवादीच्या जिवावर बस्तान बसवून मतदार संघात वर्चस्व निर्माण केलेल्या परिचारक यांनी तिकीट मिळत नाही. अशी कुणकुण लागताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेत उडी घेतली. त्याचवेळी स्थानिकांना विश्वासात न घेता खा. राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांनी ज्यांच्याविरूद्ध ऊस दरासाठी आंदोलने केली. लाठय़ा, काठय़ा खाल्या त्यांनाच पक्षात घेऊन उमेदवारी दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेत दुफळी निर्माण झाली आणि याचाच फटका परिचारकांना बसल्याचे बोलले जात आहे. परिचारकांना निवडून आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, खा. राजू शेट्टी, माधव भंडारी, पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्यासह अनेक मातब्बर नेत्यांनी प्रचार सभा घेतल्या होत्या. पण आ. भालकेंच्या पुढे कुणाचाही करिश्मा चालला नाही. पंढरपुरातून अनेक सामाजिक कार्यकर्ते शिवसेनेत समाधान आवताडेंना विजयी करण्यासाठी दाखल झाले. मात्र, पूर्ण पंढरपूर शहर व तालुक्यातून आवताडेंना फक्त पाच हजाराच्या आसपास मते पडल्याने पंढरपुरातील या पाठिंबा दिलेल्या नेत्यांचीही ताकद पहावयास मिळाली. मंगळवेढा तालुक्यातून आवताडेंना छत्तीस हजाराहून अधिक मते मिळाली असून तीन महिन्यातच निवडणूक रिंगणात उतरलेल्या आवताडेंना ४१ हजाराच्या आसपास मते मिळाल्याने पुढील काळात या मतदारसंघात ते आमदारकीचे दावेदार असू शकतील हे नाकारता येत नाही. या निवडणुकीत आ. भालकेंना सोडून दुसर्या गटात दाखल झालेल्या अनेक नेतेमंडळीची मात्र पंचाईत झाली आहे. पाच वर्षे आ. भालकेंच्या सावलीत राहून कामे पदरात पाडून घेऊन मोठे झालेले अनेकजण समोरून अधिक 'लक्ष्मी'दर्शन होईल या आशेने त्यांना सोडून गेले. परंतु, सर्वसामान्य मतदारांनी मात्र आ. भालकेंना सोडलं नाही. पंढरपुरातून परिचारक व आ. भालकेंना एकंदरीत समानच मते मिळाली असली तरी मंगळवेढेकरांनी मात्र आ. भालकेंवर परत विश्वास दाखवित आमदारकी बहाल केली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment