निवडणुकीदरम्यान अनेक अफवांना ऊत ?
आ. भालके यांना अनेक गटांचा मिळाला पाठिंबा
मंगळवेढा
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात कॉंग्रेसचे उमेदवार आमदार भारत भालके यांनी विजय मिळविला. या विजयाबरोबरच मतदारसंघात फक्त भालकेंचीच लाट आहे हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. अटीतटीच्या तिरंगी लढतीत आ. भालके यांना ९१ हजार ८६३, स्वाभिमानीचे प्रशांत परिचारक यांना ८२ हजार ९५0 तर शिवसेनेचे समाधान आवताडे यांना ४0 हजार ९१0 मते मिळाली. आ. भालके यांच्या विजयात ३५ गावांतील मतदारांनी दिलेले मोठे मताधिक्य मोलाचे ठरले. निवडणूक काळात अनेक अफवांना उत आला होता. मात्र, मतदारांनी आ. भालके यांच्या पाठीशी उभा रहात पुन्हा एकदा त्यांनाच संधी दिली आहे. आ. भालके यांना ३५ गावचा पाणीप्रश्न निवडणुकीत डोकेदुकी ठरू नये म्हणून त्यांनी वेळीच हा प्रश्न मार्गी लावला. या प्रश्नासाठी त्यांनी मुख्यमंत्री व अनेक मंत्र्यांकडे पाठपुरावा कायम ठेवला. सततचा पाठपुरावा व रेट्यामुळेच मंगळवेढेकरांसाठी ही योजना मंजूर झाली हे इथल्या जनतेने नाकारले नाही. निवडणूकीत कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता ३५ गावातील जनतेच्या मतांनी आ. भालके यांना निर्णायक आघाडी मिळवून त्यांचा विजयाचा मार्ग मोकळा केला. आ. भालके यांनी ३५ गावचा पाणीप्रश्न फक्त कागदावरच मार्गी लावला आहे, त्यांनी जनतेची दिशाभूल केली आहे. अशा अफवांनी मतदारसंघात विषारी प्रचार केला होता. परंतु, मतदारांनी आ. भालकेंना मताधिक्य देऊन या अफवांना मूठमाती दिल्याचेच दिसते. आ. भालके हे काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले पण राज्यात सत्ता ही भाजपची असणार आहे. तर ३५ गावांच्या पाणी प्रश्नावर मंजूरी मिळालेलीच आहे पण निधी मात्र अद्याप मिळालेला नाही. मतदार संघाचा विकास व ३५ गावचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आ. भालके हे सरकार कडून कसा निधी खेचून आणणार आहेत हे काही दिवसातच पाहावयास मिळेल. 'स्वाभिमानी'चे परिचारक यांनी गेल्या अनेक वर्षापासून पंढरपूर अर्बन बँक व युटोपियन कारखान्याच्या माध्यमातून मतदार संघात जवळीकता वाढवली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा मतदार संघात फारसा परिणाम झालेला दिसला नाही. परिचारक यांना बोराळे, लक्ष्मी दहिवडी या गटात चांगले मताधिक्य मिळाले. परंतु, ते विजयासाठी पुरेसे ठरले नाही. शिवसेनेचे उमेदवार समाधान आवताडे यांनी कमी वेळेत प्रभावी यंत्रणा उभारून आ. भालके व परिचारक यांना घाम फोडला होता. आवताडे यांनी कुणावरच टीका न करता आपण मतदार संघाचा विकास करण्यासाठी उभे असल्याचा पावित्रा घेतला होता. पण, पाहिल्याच निवडणुकीत आवताडे यांना ४१ हजार मते मिळवून त्यांनी मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यात आपली ताकद दाखवून दिली आहे.
Post a Comment