0

सोलापूर / प्रतिनिधी
लोकसभा, विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपताच राज्यातील मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याची तयारी निवडणूक प्राधिकरणाकडून सुरु करण्यात आली असून डिसेंबर महिन्यात जिल्ह्यातील ३१ मार्च २0१४ पर्यंतच्या मुदत संपलेल्या संस्थांच्या निवडणुका घेण्याची प्रक्रि या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सुरु असल्याचे जिल्हा उपनिबंधक बी. टी. लावंड यांनी सांगितले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी घेतला होता. त्यामुळे मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या संचालकांना आणखी काही महिने नेतृत्व करण्याची संधी आपसुकच मिळाली होती. लोकसभा अन् विधानसभा निवडणुका संपल्याने सहकारी संस्थांच्या निवडणुका डिसेंबर महिन्यात घेण्याच्या हालचाली प्रशासनाकडून गतिमान करण्यात आल्या आहेत. सर्व संस्थांच्या निवडणूका ९७ व्या घटना दुरुस्तीमधील तरतुदीनुसार स्थापन झालेल्या निवडणूक प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहेत. त्यामुळे नव्या नियमांमुळे अनेक सभासदांची व निवडणूक लढविणार्‍या इच्छुक कार्यकर्त्यांची चांगलीच गोची होणार आहे. ९७ व्या घटना दुरुस्तीमधील तरतुदीनुसार राज्यातील २५ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात घेण्याची तयारी निवडणूक प्राधिकरणाकडून ठेवण्यात आल्याचे समजते. जिल्ह्यातील सहकारी संस्थांवर वर्चस्व असणार्‍या नेत्यांनी पुन्हा संस्थांवर वर्चस्व ठेवण्याची जोरदार तयारी सुरु केली असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेच्या रणधुमाळीनंतर पुन्हा एकदा गावांगावात गटातटाचे राजकारण होताना दिसून येत आहे. विविध कार्यकारी सोसायटीची थकबाकी असणार्‍या सभासदाला मतदान करता येणार नाही. शिवाय त्याला निवडणूकही लढविता येणार नाही. त्यामुळे जर थकबाकीदार सभासदाला निवडणूक लढविण्याची इच्छा असेल तर त्याला संबंधित संस्थेची थकबाकी भरावी लागणार आहे. आणि रक्कम भरल्याची पोच जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून घेऊन संबंधित संस्थेकडे दिल्यास मतदानाचा अधिकार मिळणार आहे. ३१ मार्च २0१४ पूर्वी मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा धूमधडाका डिसेंबरमध्ये सुरु होत असल्याने गावपातळीवरील नेत्यांनी संस्था ताब्यात घेण्यासाठी कंबर कसून तयारी सुरु केली आहे.

Post a Comment

 
Top