0

मंगळवेढा / तालुका प्रतिनिधी
एका मोबाईलवरुन मंगळवेढा शहरातील प्राध्यापकाला फोन आला. हिंदीतून बोलत त्याने 'साहब मेरे पास चार किलो सोना है, सस्ते मे देत आहे, होना है तो जल्दी लो, मुझे हॉस्पिटलमें पैसों की सख्त जरुरत है..' या शब्दात त्या प्राध्यापकला फोन आल्यानंतर त्याने शांतपणे मला सोने नको आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही कोणाला सोने विकू नका, असे सांगितले. इतकेच नव्हे तर सदरहू प्राध्यापकाने मंगळवेढा पोलिस ठाण्यात येवून या बद्दलची माहिती देवून ज्या मोबाईलवरुन फोन आला त्याचा मोबाईल नंबर देखील त्यांनी पोलिस ठाण्यात दिला. त्यामुळे फसवणूकीची मोठा घटना टळल्याचीच चर्चा सुरू झाली. सध्या निवडणूक संपल्यानंतर दिवाळी सुरु झाली आहे. तालुक्यातील जनतेने अशा प्रकारच्या खोट्या फोनवर विश्‍वास ठेवू नये व चुकीच्या मार्गाने आलेले सोने खरेदी करु नये, असे आवाहन त्या प्राध्यापकासह मंगळवेढा पोलिस ठाण्याने केले आहे. मुळात अशा प्रकारचे सोने खरे असू शकत नाही, हे सोने खरे खोटे न पाहता कमी रकमेत मिळते म्हणून घेतले जाते. परंतू नंतर फसवणूक झाल्यानंतर रडत बसल्याशिवाय पर्याय राहत नाही. कमी कष्टात अशा प्रकारचा नफा मिळविणे चुकीचे आहे. या प्रकारामध्ये सोने खरेदी करणारापेक्षा सोने विकणारा हुशार ठरतो. विकत घेणाराला हे लक्षात येत नाही. सोन्याला सोन्यासारखी किंमत आहे. सराफाच्या दुकानात त्याला तेवढे पैसे मिळत असताना चार गावे सोडून तो ग्रामीण भागात येवून कमी रकमेला सोने का विकतो? याचा विचार देखील साधा केला जात नाही. यामुळे अनेकजण या प्रकाराला बळी पडतात. त्यांच्यावर पश्‍चाताप करुन घेण्याची वेळ येते. अशा प्रकारे फोन आल्यास पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन मंगळवेढा पोलीसांनी केले.

Post a Comment

 
Top