0

कोल्हापूर / प्रतिनिधी
घरी धुणेभांडी करणार्‍या ७२ वर्षांच्या वृद्धेचा प्रा. आमित नायकवडी (रा. लाईन बाजार परिसर, साईनाथ कॉलनी) याने विनयभंग केला. या प्रकारानंतर तरुणांनी या प्राध्यापकाच्या घरावर दगडफेक करून वाहनांची तोडफोड केली. हा प्रकार गुरुवारी सकाळी दहा वाजता घडला. विनयभंग प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलीस ठाण्यातून समजलेली माहिती अशी, साईनाथ कॉलनी, लाईन बाजार येथे राहणारा प्रा. अमित समशुद्दीन नायकवडी (वय ३८) याची पत्नी मुलासह बाहेरगावी गेली आहे. गुरुवारी सकाळी तो एकटाच घरात होता. दहा वाजण्याच्या सुमारास त्याच्या घरात धुण्याभांड्याचे काम करणारी ७२ वर्षांची महिला आली. ही वृद्धा भांडी घासत असताना अमित तेथे आला आणि पाठीमागून वृद्धेशी असभ्य वर्तन करू लागला. वृध्देने त्याला चांगलेच खडसावल्यानंतर तो तेथून निघून गेला. वृद्धेने हा प्रकार आपल्या घरी सांगितला. त्यानंतर वृद्धा दुपारी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गेली. प्रा. अमित नायकवडी याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार लाईन बाजार व कसबा बावडा येथील तरुणांना समजल्यावर तरुणांनी प्राध्यापक अमित यांच्या घरावर दगडफेक केली. त्याच्या घरासमोर लावलेल्या दुचाकीची तोडफोड केली. ही माहिती शाहूपुरी पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जमावाला पांगवले. त्यानंतर या प्राध्यापकाला अटक केली आहे.

Post a Comment

 
Top