0

फळबाग शेतकरी चिंताग्रस्त
लक्ष्मीदहिवडी / प्रतिनिधी
सध्या दोन दिवसापासून हवामानात कमालीचा बदल झाला असून पूर्णपणे ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी दिवसभर रिमझिम पाऊस सुरू होता. हवेमध्येही गारवा निर्माण झाला असून हे वातावरण ज्वारी पिकासाठी पूरक असले तरी डाळिंब, द्राक्षे पिकांसाठी घातक असल्याने फळबाग शेतकरी चिंतेत आहेत. शनिवार व रविवार या दोन दिवसात सूर्यदर्शन झालेच नाही. वारंवार तुरळक हलक्या पावसाच्या सरी येत असल्याने हवेत गारवा निर्माण झाल्याने पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. डाळिंब या फळ पिकाला या वातावरणाचा फटका बसणार असून तेलकट, कुजवा, फुलगळ सुरू झाली असून याचा जोरदार फटका शेतकर्‍यांना बसणार आहे. अनेक फळबागा गेल्या तीन महिन्यापासून तेल्याच्या कचाट्यातून वाचवून शेतकर्‍यांनी संभाळल्या आहेत तर काहींनी डबल पानगळ केली आहे. त्या फळबागा सध्या फुलधारणेत आहेत. अशा बागांची फुलगळ होण्याची भीती असल्याने अनेक शेतकरी चिंताग्रस्त आहेत तर द्राक्षांवर दावण्या रोगाचा प्रभाव या वातावरणात वाढत असल्याने एकंदरीत हे वातावरण फळबाग शेतकर्‍यांसाठी धोकादायक बनले आहे.

Post a Comment

 
Top