0

मंगळवेढा / प्रतिनिधी
महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेशातील धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या महालिंगराया व बिरोबा या गुरु-शिष्य भेटीचा सोहळा याची देही याची डोळा लाखो भाविकांनी चांगभलंच्या गजरात व जयघोषाने परिसर दणाणून गेला होता तर उधळलेल्या भंडार्‍यात भाविक न्हाऊन निघाले होते. हुलजंती (ता.मंगळवेढा) येथे हुन्नूरचा बिरोबा व हुलजंतीचा महालिंगराया यांच्या भेटीचा सोहळा पाहण्यासाठी लाखांहून अधिक भाविकांनी हजेरी लावली होती.या भेटीदरम्यान भाविकांनी भंडारा व लोकराची मनसोक्त उधळण केली.चडचण, सोड्डी, मंगळवेढा मार्गावर वाहने व भाविकांची मोठी गर्दी होती. गुरुवार पासून भाविक रात्रभर ओव्या, प्रवचन भजनामध्ये दंग होते. शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पौट रस्त्यालगतच्या मंदिरापासून भेटीचा सोहळा रंगला. यामध्ये शिरढोनचा बिरोबा, शिलवंती, उटगीचा ब्रम्हलिंगदेव, सोन्याळचा पांडुरंग विठ्ठल, जिरअंकलगीचा बिरोबा, खसगीचा अवतार बरगारसिध्द व बिज्जरगीचा बुळाप्पाराया आणि बिरोबा या पाच पालख्यांचा भेटीचा सोहळा रंगला. भाविकांच्या जयघोषात नगारे,ढोलच्या तालाने आसमंत दणाणून गेला. ओढय़ातून निघालेल्या महालिंगरायाच्या पालखीची भेट बिरोबाच्या पालखीसामोर झाली. यावेळी अनेक भाविकांनी भंडारा उधळून भेटीचा आनंद घेतला.

Post a Comment

 
Top