0

सोलापूर
जिल्ह्यातील शेतकर्‍यांची आर्थिक नाडी असणार्‍या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बंॅकेच्या संचालक मंडळाची विधानसभा निवडणुकीनंतर पहिलीच मासिक सभा काल (शनिवारी) दुपारी तीन वाजता बोलाविण्यात आली होती. या सभेस तब्बल अकरा संचालकांनी दांडी मारल्याचे दिसून आले. तर निवडणुकीनंतर बोलाविण्यात आलेल्या पहिल्याच बैठकीत विविध प्रकारच्या ३९ विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. बंॅकेचे अध्यक्ष दिलीप माने यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी बंॅकेच्या सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सभागृहात संचालक मंडळाची मासिक सभा पार पडली. या बैठकीस ज्येष्ठ नेते तथा खा. विजयसिंह मोहिते-पाटील, आ. दीपकआबा साळुंखे-पाटील, आ. बबनदादा शिंदे, आ. दिलीप सोपल, माजी आमदार राजन पाटील, एस. एम. पाटील, रामभाऊ हक्के, सुरेश हसापुरे, डॉ. संजय कांबळे, अरुण कापसे, चंद्रकांत देशमुख, सरव्यवस्थापक किसन मोटे आदी संचालकांनी उपस्थिती लावली होती. विधानसभा निवडणुकीनंतर बंॅकेची पहिलीच मासिक सभा होत असल्याने या सभेस संचालक असणारी सर्व नेते मंडळी उपस्थित राहतील अन् नेत्यांची भेट होईल या भावनेने कार्यकर्त्यांनी सभागृहाबाहेर मोठी गर्दी केली होती. परंतु या सभेस तीन सेवक प्रतिनिधी वगळता केवळ १२ संचालकांनीच उपस्थित लावली होती. त्यामुळे सभेस उपस्थित नसणार्‍या नेत्यांना भेटण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांचा मात्र चांगलाच हिरमोड झाल्याचे दिसून येत होते. तर पराभव झाल्यामुळे अमुक अमुक जण आले नाहीत. पराभवानंतर माझा फोनही अमक्यांनी उचलला नाही. आजच्या बैठकीला ते येतील म्हणून मी लांबून आलो. अन् काय तेच आले नाहीत, अशी चर्चा सभागृहाबाहेर ऐकावयास मिळत होती. या सभेच्या विषय पत्रिकेवर एकूण ३९ विषयांचा समावेश होता. सर्व विषयांना उपस्थित संचालकांनी एकमताने मंजुरी दिली. विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन सरव्यवस्थापक किसन मोटे यांनी केले. या बैठकीत येणार्‍या हंगामात शेतकर्‍यांना करण्यात येणारे पीककर्ज वाटप व बंॅकेच्या थकीत वसुलीवरही चर्चा झाली असल्याचे बैठकीनंतर सांगण्यात आले.

विधानसभा निवडणुकीत करमाळा मतदारसंघातून उमेदवार असणारे बंॅकेचे माजी अध्यक्ष संजयमामा शिंदे, जयवंतराव जगताप, रश्मी बागल-कोलते, पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील उमेदवार प्रशांत परिचारक यांचे काका तथा ज्येष्ठ नेते सुधाकर परिचारक, शिवसेनेकडून निवडणूक लढविलेल्या समाधान आवताडे यांचे काका तथा बंॅकेचे उपाध्यक्ष बबनराव आवताडे, अक्कलकोटचे सिद्रामप्पा पाटील या मातब्बर संचालकांनी सभेस दांडी मारल्याचे दिसून आले.

Post a Comment

 
Top