0

उजनी (टें) पासून निर्मलग्रामची सुरुवात
मोडनिंब / प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी 'निर्मल भारत अभियानाची मुहूर्तमेढ' ७ वर्षापूर्वी, जेव्हा ते माढा येथे प्रशिक्षणार्थी गटविकास जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते त्यावेळीच रोवलेली आहे. माढा तालुक्यातील उजनी (टें) हे गाव निर्मलग्राम करण्यामध्ये मुंढे यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यावेळी त्यांनी उजनी (टें) गावात थेट जनतेशी संपर्क साधून कधी प्रबोधनातून तर कधी कायदय़ाचा बडगा दाखवून निर्मलग्राम अभियानाबाबत जनतेची मानसिकता तयार केली. त्याचे फलित म्हणजे त्यावर्षीच सोलापूर जिल्ह्यातील पहिले निर्मलग्राम होण्याचा मान उजनी (टें) गावाला मिळाला आणि तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते सन्मानित होण्याची संधी सरपंच ज्योती पाटील आणि स्वच्छता समितीचे प्रमुख प्रा. सुहास पाटील यांना मिळाली. त्यावेळच्या माढा विभागाच्या उपविभागीय अधिकारी मंजुषा मिसकर यांनीही उजनी (टें) गावामध्ये ग्रामसभा घेऊन उद्बोधून करण्याचा यशस्वी प्रयोग केलेला होता. आज नूतन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या स्वागतासाठी स्वच्छतादूत प्रा. सुहास पाटील हे जिल्हाधिकार्‍यांच्या कक्षात गेले असता मागील कामाचा आढावा घेत त्यांनी अनेक लहान मोठय़ा आठवणींना उजाळा देत निर्मलग्राम उजनी (टें) ची आजची स्थिती काय आहे, याचा आढावा घेतला. सात वर्षापूर्वी प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी असताना तुकाराम मुंढे यांची निर्मलग्राम अभियानामागची जी तळमळ आणि कामाची तत्परता आम्ही ग्रामस्थांनी अतिशय जवळून पाहिली, अनुभवली आहे. आता सोलापूर जिल्हा निर्मलग्राम जिल्हा होण्यासाठी ते आणखी प्रभावीपणे काम करतील, अशी अपेक्षा यावेळी स्वच्छतादूत प्रा. सुहास पाटील यांनी व्यक्त केली. त्यावर निर्मल भारत अभियान जिल्ह्यात यशस्वी होण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना एकत्रित करुन ही मोहीम यशस्वी करण्याचा मनोदय मुंढे यांनी व्यक्त केला. यावेळी उपजिल्हाधिकारी मंजुषा मिसकर याही उपस्थित होत्या.

Post a Comment

 
Top